कल्याणमध्ये दूषित आणि आळ्यामिश्रित पाणी पुरवठा

KDMC
KDMC

कल्याण : कल्याण पूर्वेतील दूषित आणि आळ्यामिश्रित पाणी पुरवठा प्रकरणी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम पूर्ण केले असून उद्या पुन्हा पाण्याचे नमुने घेण्यात येणार असून नागरीकांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

कल्याण पूर्व मधील गणेश वाडीसहित अन्य ठिकाणी दूषित आणि आळ्या मिश्रित पाणी पुरवठा मागील आठवड्यात झाल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण होते. तर वारंवार दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांत संतापाचे वातावरण होते. 

या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांनी आपल्या पथकाला पाठवून पाण्याचे नमुने घेत, नागरीकांना त्रास होऊ नये म्हणून सर्वेक्षण केले तर कल्याण पूर्व पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता अशोक घोडे यांनी दूषित आणि आळ्या मिश्रित पाणी पुरवठा प्रकरणी शोध मोहीम सुरू केली. 

त्या परीसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन स्वच्छता आणि साफसफाई करून घेतल्या तर गळती होते का तेथे दुरुस्तीची काम हाती घेतले होते ते आज सोमवारी (ता. 11) पूर्ण झाले आहे. उद्या पाणी पुरवठा पुन्हा सुरू झाल्यावर पाणी पुरवठा आणि वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत पुन्हा पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे. वारंवार गणेशवाडीसहीत कल्याण पूर्व मध्ये दूषित पाणी आणि आळ्यामिश्रित पाणी पुरवठा का होतो यावर तोडगा काढण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. 

आळ्या मिश्रित पाणी पुरवठा तक्रार येताच कल्याण पूर्व मध्ये आरोग्य विभागाच्या विशेष पथकामार्फत तेथे सर्वे केला. पाण्याचे नमुने प्रति दिन घेतले जात असून त्याचा अहवाल प्राप्त होताच पुढील उपाययोजना करू मात्र पाणी पुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम करावे अशा सूचना दिल्याची माहिती पालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांनी दिली. 

दूषित पाणी आणि आळ्या मिश्रित पाणी पुरवठ्याबाबत तक्रार येताच दुरुस्तीचे काम हाती घेतले ते पूर्ण झाले आहे, त्या परीसरातील सर्व पिण्याच्या पाणी पुरवठा करणारे पाईप लाईनची साफसफाई केली असून उद्या पाणी पुरवठा सुरळीत झाल्यावर पुन्हा पाण्याचे नमुने घेऊ अशी माहिती कल्याण पूर्व पाणी पुरवठा उपअभियंता अशोक घोडे यांनी दिली.

शटडाऊन रद्द
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहने उदनचन केंद्रातील पंपाच्या दुरुस्तीचे काम सोमवारी (ता. 11) करण्यात येणार असून त्यामुळे कल्याण पूर्वेत पाणी पुरवठा बंद राहणार होता. मात्र रविवारी रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण झाल्याने शटडाऊन रद्द केल्याने कल्याण पूर्व मधील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला.


पालिकेचे आवाहन - 
1) दूषित, गढूळ, आळ्या मिश्रित पाणी आल्यास त्वरीत कळवा.

2 ) पाण्याची गळती होत असेल तर त्वरीत दुरुस्त करून घ्या.

3 ) पाणी उकळून प्यावे. नागरीकांनी घाबरू नये, मळमळ होणे अथवा ताप आल्यास पालिकेच्या रुग्णालयात त्वरीत उपचार घ्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com