पर्यावरणपूरक होळी साजरी करा! 

पर्यावरणपूरक होळी साजरी करा! 

दादर - बच्चेकंपनीच्या आवडीचा सण म्हणजे होळी. होळीला पुरणपोळीवर ताव मारून दुसऱ्या दिवशी रंगपंचमीनिमित्त एकमेकांवर पिचकारीतून रंग उडवण्यासारखा दुसरा आनंद नाही. लहान-थोर सर्वांच्याच आनंद आणि उत्साहाचा केंद्रबिंदू असलेल्या होळीसाठी मुंबईच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. विविध प्रकारच्या पिचकाऱ्या आणि रंगांनी दादर-वरळीसह मुंबईची बाजारपेठ रंगीबेरंगी झाली आहे. धुळवडीच्या उत्साहात वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय आणि रासायनिक रंग टाळत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन सामाजिक संस्थांनी केले आहे. नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी "सकाळ'च्या माध्यमातून केले आहे. 

बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी छोटा भीम, अँग्री बर्ड, डोरेमॉन आणि डोरा कार्टूनच्या पिचकाऱ्यांची बाजारात चलती आहे. माश्‍याच्या आकारातील पिचकाऱ्यांनाही लहानग्यांची पसंती मिळत आहे. कार्टून पिचकाऱ्यांच्या किमती 100 पासून 800 रुपयांपर्यंत आहेत. जास्तीत जास्त पाणी राहू शकेल, अशा नवीन आकार आणि डिझाईनच्या स्कूल बॅग पिचकाऱ्यांना अधिक मागणी आहे. 

मुंबईत अनेक ठिकाणी उंच होळी तयार करून त्यातून सामाजिक संदेश दिला जातो. वरळीच्या वीर नेताजी क्रीडा मंडळाची आणि विघ्नहर्ता मंडळाची होळी दरवर्षी वरळीकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. त्याचबरोबर दादर, परळ, लालबाग आदी ठिकाणी दरवर्षी होळी सणानिमित्त समाजात जनजागृती किंवा वाईट गोष्टींचा निषेध केला असतो. 

होळी म्हणजे रंगांचा सण. त्यानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन रंगांची उधळण करा. परंपरा जपत होळी नक्की बांधा; पण त्यासाठी वृक्षतोड करू नका. टाकाऊ पदार्थांची होळी करा. ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शक्‍य तितक्‍या सुक्‍या आणि इकोफ्रेंडली रंगांनी होळी खेळा. 
- दीपाली जंगम (अक्षरा सामाजिक संस्था) 

दिवसेंदिवस होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेता आपले सर्व सण पर्यावरणपूरक असायला हवेत. नैसर्गिक रंगांनी होळी खेळायला हवी. सोबतच पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. बेसावधपणे रंगांचे फुगे डोळ्यावर पडले तर त्यामुळे इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे रासायनिक रंगांचा व प्लास्टिक पिशव्या वा फुग्यांचा वापर न करताच होळीचा सण साजरा करा. 
- सौरभ मुंबईकर (प्रयास सेवाभावी संस्था) 

पाण्याचा अपव्यय टाळा 
होळी साजरी करताना आनंद घ्या; पण पाण्याचा अपव्यय टाळा. एक दिवसाच्या आनंदासाठी हजारो लिटर पाणी वाया घालवू नका. जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. आपणही त्याच समाजाचा भाग आहोत, याचे भान असू द्या. सुक्‍या रंगांनी होळी खेळा, असे आवाहन युवा आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोरख उबाळे यांनी केले. 

मुक्‍या प्राण्यांची काळजी घ्या 
रंगपंचमी खेळताना आजूबाजूच्या मुक्‍या प्राण्यांची काळजी घ्या. तुम्ही आनंद घेत असताना त्यांच्या अंगावर रंग टाकून त्यांना विद्रूप करू नका. रंग अनेक दिवस तसेच राहत असल्याने प्राण्यांना त्वचेचे रोग होऊ शकतात. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर पडणारा प्लास्टिकचा खच टाळण्यासाठी यंदाची होळी इकोफ्रेंडली खेळून तिचा आनंद घ्या, असे आवाहन जय फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com