25 ते 31 डिसेंबरमध्ये होणाऱ्या पार्ट्यांवर अन्न व औषध विभागाची करडी नजर

fda.
fda.

कल्याण : 25 डिसेंबर ख्रिसमस ते 31 डिसेंबर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवली शहरातील हॉटेल, बार, ढाब्यांवर पार्ट्या आयोजित केल्या जातात, या पार्ट्यांमध्ये नागरीकांना देण्यात येणारे अन्न स्वच्छ आणि सुरक्षित आहे ना? अन्न वाटप करणाऱ्या कर्मचारी वर्गाची आरोग्याची तपासणी केली आहे का? याबाबत अन्न व औषध कोकण विभाग सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या आदेशानुसार अन्न व औषध ठाणे विभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय कडगे यांनी विशेष पथकाची निर्मिती केली असून त्या पथकाने कल्याण डोंबिवली शहरी ग्रामीण आणि हायवेवरील हॉटेल्स, ढाबा, बार, तपासणी मोहीम सुरु केल्याने अनेक हॉटेल्स मालकांचे धाबे दणाणले आहे. 

दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत कल्याण डोंबिवलीकर नववर्षाच्या स्वागतासाठी कोणी बाहेरगावी अथवा शहरातील हॉटेल्समध्ये सहकुटुंब जाऊन सहभोजनाचा आनंद घेतात. हॉटेल व्यावसायिकांचीही यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. हॉटेलवर रोषणाई आणि स्पेशल मेनू त्यासाठी तयार करण्यात येतो. विविध प्रकारच्या डिशेस आणि स्वादिष्ट पदार्थांची लयलूट करून ग्राहकांसाठी पर्वणी असते. याबरोबरच काही मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात. हॉटेल व्यावसायिकांनी खाण्याच्या पदार्थांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मोठय़ा हॉटेल्ससह शहरातील छोटी हॉटेल्स आणि फास्ट फूडवरही नागरिक चांगलाच ताव मारतात. शहरातील गर्दी पाहता भिंवडी रोड, पडघा रोड, हाजी मंलगरोड, शिळ फाटा रोडवरील हॉटेल, ढाब्यावर ही तयारी सुरु झाली असून यांची अन्न व औषध ठाणे विभागाच्या विशेष पथकाने चौकशी सुरु केली आहे. 

25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद नागरीक घेतात, गर्दी वाढल्याने हॉटेलात वाट पाहावी लागते. त्यामुळे भराभर ऑर्डर पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असल्याने अन्नाची सुरक्षितता, त्याची स्वच्छता आणि दर्जा यांची सांगड घालणे अनेकांना कठीण होऊन दुर्लक्ष होण्याचाच प्रकार अधिक घडतो. त्यासाठी या सर्वांची तपासणी सर्व हॉटेल, स्टॉल्सवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक आणि अधिकारी जाऊन करणार आहेत. यासाठी असलेल्या निकषाचीही तपासणी या वेळी करण्यात येईल. तसेच अन्नाचे नमुनेही घेण्यात येणार आहे. 

नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई -

अन्नपदार्थ वाहतुकीच्या व्यवसायातील वार्षिक उलाढाल 12 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याने वाहतूक परवाना न घेतल्यास, विना परवाना ही वाहतूक केल्यास 6 महिने तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. 
12 लाखापेक्षा कमी असेल तर आणि परवाना न घेतल्यास 1 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. हॉटेल मालकांनी आपल्या हॉटेल्स मध्ये निगा राखा, नियमांचे पालन करा, नागरीकांच्या आरोग्यास धोका होईल अशी अन्न पदार्थात भेसळ करू नका, परवाने घ्या आणि नवीन वर्षसंध्या आनंदात साजरी करा, नागरिकांना काही तक्रार असल्यास अन्न व औषध ठाणे विभागाच्या 1800222365 या हेल्प लाईनवर तक्रार करा असे आवाहन अन्न व औषध कोकण विभाग सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com