कल्याण, डोंबिवलीत वीजतारा तुटल्याने इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान

कल्याण, डोंबिवलीत वीजतारा तुटल्याने इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान
कल्याण, डोंबिवलीत वीजतारा तुटल्याने इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान

कल्याण - कल्याण, डोंबिवली शहर व ग्रामीण परिसरात विजांच्या कडकडाटासह बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. कल्याण पूर्वमधील मंगलराघोनगर परिसरामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या तारा तुटल्याने खळबळ माजली. अनेक जणांच्या घरातील टीव्ही, फ्रिज खराब झाले. तर काहींचे मीटरही खराब झाले. दरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली.

बुधवार सायंकाळी साडेआठ नंतर कल्याण डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाने वाऱ्यासहित वीजेचा कडकडाट करत हजेरी लावली. त्यामुळे पालिका हद्दीत सहा-सात ठिकाणी झाडे पडली. तर कल्याण पूर्वमध्ये खडेगोलवली, मंगल राघोनगर, काटेमानवली विठ्ठलवाडी परिसरामधील सखल भागात आणि नालेशेजारील नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तर काटेमानवली परिसरामध्ये वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर खराब झाला. यामुळे कल्याण पूर्वमधील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. तर मंगलराघोनगरच्या प्रवेशद्वारावर उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्याने परिसरामधील विद्युत पुरवठा खंडित झाला. या कालावधीत स्थानिक नगरसेविका सुशीला माळी यांच्यासह तेथील अनेकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, वीजमीटर जळाले. या घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यां आज (गुरुवार) सकाळपासूनच दुरुस्तीचे काम हाती घेतले. आज दुपारी कल्याण पूर्व मधील सुमन, शिवनेरी, मनोहर म्हात्रे कॉलनी परिसर मधील वीज पुरवठा करणाऱ्या खांब्याच्या तारा तुटल्याने त्या परिसर मधील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे कल्याण पूर्व भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. नागरिकांच्या नुकसानीची महावितरणने भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मुसळधार पावसात विद्युत पुरवठा खंडित झाला. टॉवरच्या तारा तुटल्या. याच काळात माझ्या घरातील दोन टीव्ही खराब झाले. माझ्या मंगलराघोनगर वार्डमध्ये अनेक नागरिकांच्या घरातील मीटर जळाले. फ्रिज, टीव्ही, खराब झाले. याबाबत महावितरण अधिकारी वर्गाला पत्र देऊन त्यांच्या सोबत सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी करून पाठपुरावा केला जाईल अशी माहिती स्थानिक शिवसेना नगरसेविका सुशीला माळी यांनी दिली .

मुसळधार पावसात काटेमानवली परिसरामध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने काही परिसरमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला. तर मंगलराघोनगरमध्ये उच्च दाबाच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या तारा तुटल्या. आज दिवसभर दुरुस्ती काम करून पुन्हा दुपारी वीज पुरवठा सुरळित करण्यात आला, अशी माहिती महावितरण कल्याण उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com