नगरसेवकाने केले महापालिकेच्या कामकाजाचे फेसबुकवरून थेट प्रक्षेपण!

सुचिता करमरकर
बुधवार, 21 जून 2017

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी आपली तहकूबी मांडतानाच्या प्रसंगाचे चक्क "फेसबुक लाईव्ह'द्वारे थेट प्रक्षेपण केले आहे. आपण सभागृहात फेरीवाल्यांच्या विषयावर जे बोललो ते सर्व नागरिकांना कळावे हा या मागचा उद्देश असल्याचे यांचे म्हणणे आहे.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत बोलतानाच्या प्रसंगाचे चक्क "फेसबुक लाईव्ह'द्वारे थेट प्रक्षेपण केले आहे. आपण सभागृहात फेरीवाल्यांच्या विषयावर जे बोललो ते सर्व नागरिकांना कळावे हा या मागचा उद्देश असल्याचे यांचे म्हणणे आहे.

या "फेसबुक लाईव्ह' बाबत बोलताना म्हात्रे म्हणाले, "महापालिकेच्या सभेत मांडण्यात येत असलेला प्रत्येक विषय हा सार्वजनिक होतो. माहितीच्या अधिकारात सभेतील सर्व माहिती सीडी स्वरुपात उपलब्ध असते. आम्ही सोशल मिडियाचा आधार घेत नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न केला.'

फेरीवाल्यांच्या प्रश्‍नाबाबत "फेसबुक लाईव्ह' मध्ये म्हात्रे म्हणाले, " फेरीवाल्यांचा विषय अतिशय संवेदनशील आहे. त्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सोसावे लागत असल्याने आंदोलन करुन विषय सोडून दिला नसून त्याचा पाठपुरावा करत असल्याची माहिती या लाइव्हमधून दिल्याची भूमिका म्हात्रे यांनी मांडली.'

या "फेसबुक लाइव्ह'बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हरकत घेतली असून महापौरांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. पालिकेच्या कायद्यात याप्रकारच्या घटनेबाबत कोणतेही मार्गदर्शन नाही. पालिकेची नियमावली ज्यावेळी तयार करण्यात आली त्यावेळी सोशल मिडिया नसल्याने सभागृहात घडणाऱ्या घटनांबाबत पीठासीन अधिकाऱ्यांना अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचे सचिव कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.

'फेसबुक लाईव्ह'ला मोठा प्रतिसाद
म्हात्रे यांनी फेसबुकद्वारे लाईव्ह केलेल्या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 848 लाईक्‍स मिळाल्या असून तब्बल 56 जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर 40 पेक्षा अधिक जणांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.