लोकसभेसाठी शिवसेनेची चाचपणी; 12 मतदारसंघांबद्दल विश्‍वास

लोकसभेसाठी शिवसेनेची चाचपणी; 12 मतदारसंघांबद्दल विश्‍वास

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्‍मा, तसेच अमित शहा यांच्या नियोजनाच्या आधारावर भाजपने लोकसभेसाठी 350 जागांचे लक्ष्य ठेवले असतानाच शिवसेनेनेही अंतर्गत चाचपणी करत आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला आहे. या चाचपणीत महाराष्ट्रातील 12 लोकसभा मतदारसंघ आजही अतिशय सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीराव आढळराव पाटील, प्रतापराव जाधव, रवी गायकवाड, डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, तसेच चंद्रकांत खैरे यांचे मतदारसंघ भक्कम मानले जात आहेत. परभणी या पारंपरिक मतदारसंघाबरोबरच कोकणातील अनंत गीते यांचा मतदारसंघही सुरक्षित मानला जात आहे. भावना गवळी यांना संजय राठोड यांनी साथ दिल्यास भाजपचा बालेकिल्ला ठरलेल्या विदर्भातीलही एक जागा काढता येईल, असा पक्षाला विश्‍वास आहे. मुंबईतील तिन्ही जागांवर बदललेल्या रचनेत तगडा सामना द्यावा लागेल, असे पक्षाला वाटते. त्याशिवाय कोकणात भाजप सुरेश प्रभूंना संधी देण्याची शक्‍यता व्यक्त केली जात असल्याने विनायक राऊत यांची जागा असुरक्षित मानली जात आहे.

भाजपच्या झंझावातात पक्षसंघटना संपून जाऊ नये यासाठी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार पक्का करावा, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांचे मत आहे. भाजपने मतविभाजन टाळण्यासाठी एकत्र लढण्याची तयारी दाखवल्यास वाढीव जागांची मागणी भाजपसमोर करावी असाही एक मतप्रवाह असल्याचे समजते.

दरम्यान, भाजपने मात्र शिवसेनेशी आमची वैचारिक युती आहे. त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे अमित शहा ठरवणार असल्याची माहिती देतानाच, शिवसेनेचे काही विद्यमान लोकसभा सदस्य आमच्या पक्षाकडून लढण्यास तयार असल्याचा दावा केला आहे. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने कमळ चिन्हावर लढण्यास तयार असलेल्यांची संख्या बारापेक्षाही जास्त असल्याचा दावा केला. योग्य वेळ येताच त्यासंबंधीचा तपशील बाहेर येईल असाही दावा करण्यात आला. शिवसेनेने अशा दाव्यांमध्ये कोणताही अर्थ नसून बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा असलेला प्रत्येक सैनिक नेता, कार्यकर्ता आमचाच राहील, असे सांगितले.

विरोधकांमध्ये एकीचा विचार
भाजप आणि शिवसेना लोकसभा निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाणार हे जवळपास निश्‍चित मानले जात असतानाच, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्रितपणे लढताना एकेक उमेदवार रिंगणात उतरवल्यास मतविभाजनाचा लाभ होईल, असा विचार सुरू केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेऊन हा विषय मांडला होता. भाजपने निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांतील आमदार फोडल्यास, त्या त्या ठिकाणी एकच उमेदवार दाखल करण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मान्यता दिली होती हे उल्लेखनीय. मात्र, नारायण राणे यांनी भाजपप्रवेश केल्यानंतर कालिदास कोळमकर आणि नितेश राणे कॉंग्रेस पक्ष सोडतील असा अंदाज आहे. त्या स्थितीत आमदारांचे संख्याबळ अधिक झालेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विरोधी पक्षनेतेपदावर दावा करेल. परिणामी सध्या विरोधी बाकांवर बसलेल्या पक्षांमध्ये त्यामुळे वितुष्ट येण्याची शक्‍यता आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com