फेसबुकवरील मैत्रीने कोट्यवधींचा गंडा 

अनिश पाटील
रविवार, 6 ऑगस्ट 2017

मुंबई : फेसबुकद्वारे मैत्री करून देशभरात अनेकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अटक केली. या टोळीने अमेरिकेतील जवानाचे फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे व्यवसायातील गुंतवणुकीची भूलथाप देत वांद्रे येथील व्यावसायिकाला दोन कोटींचा गंडा घातला.

आरोपींनी ही रक्कम विविध राज्यांतील 10 बॅंक खात्यांमध्ये तक्रारदाराला जमा करण्यास सांगितली होती. 

मुंबई : फेसबुकद्वारे मैत्री करून देशभरात अनेकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अटक केली. या टोळीने अमेरिकेतील जवानाचे फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे व्यवसायातील गुंतवणुकीची भूलथाप देत वांद्रे येथील व्यावसायिकाला दोन कोटींचा गंडा घातला.

आरोपींनी ही रक्कम विविध राज्यांतील 10 बॅंक खात्यांमध्ये तक्रारदाराला जमा करण्यास सांगितली होती. 

मंगल मानदीप बिष्णोई ऊर्फ सुमित अग्रवाल ऊर्फ राकेश शर्मा (वय 28, रा. बोईसर, पालघर), जितेंद्र राठोड ऊर्फ करणसिंग ऊर्फ रमेश शर्मा (30, रा. भाईंदर), समीर मर्चंड ऊर्फ संजय गुप्ता ऊर्फ रमेश अग्रवाल आणि परेश निंबड (दोघेही वय 30, रा. भाईंदर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. कांदिवलीतील गणपती टॉवर येथील एका खासगी बॅंकेत आरोपी येणार असल्याची माहिती सायबर सेलला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी चौघांना बॅंकेतून बाहेर पडल्यानंतर अटक केली. 

तक्रारदार विनोदकुमार धुवालेवाला (72) वांद्रे येथील रहिवासी आहेत. त्यांचा नाशिकमध्ये ऑटो स्पेअरपार्टचा व्यवसाय आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये विनोदकुमार यांच्यासोबत रेमंड एफ चांडलर नावाच्या परदेशी नागरिकाने फेसबुकवर मैत्री केली. आपण अमेरिकेतील सैन्यात काम करत असून, सध्या अफगाणिस्तानात तैनात आहोत, असे त्याने सांगितले. त्याने आर्मी कॉप सर्टिफिकेटही विनोदकुमार यांना पाठवले. आपण भारतात 50 हजार डॉलरची गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. विनोदकुमार यांचा विश्‍वास बसावा याकरिता त्याने ही रक्कम पंजाब बॅंकेत जमा करून त्या खात्याचे एटीएम कार्ड पाठवत असल्याचेही आरोपीने सांगितले. पुढे सबिना मिश्रा या नावाने तोतया बॅंक अधिकाऱ्याने विनोदकुमार यांना दूरध्वनी केला. त्यामुळे त्यांचा विश्‍वास बसला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय फंडसाठी कर, दहशतवादविरोधी पथकाची 'ना हरकत' आदी विविध कारणांसाठी विनोदकुमार यांना आरोपींनी 10 वेगवेगळ्या खात्यांमध्ये एक कोटी 96 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा करूनही संबंधित खात्याचे एटीएम कार्ड न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे विनोदकुमार यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांना बॅंक खाते आणि मोबाईल क्रमांकाच्या साह्याने मिळालेल्या माहितीवरून आरोपींना अटक केली. 

सारे काही बनावट!
आरोपींनी देशभरात अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशभर या आरोपींनी बनावट पॅन कार्डद्वारे 50 बनावट बॅंक खाती तयार केल्याचा संशय आहे. आरोपी बिष्णोईकडे 30, तर मर्चंड याच्याकडे 10 खात्यांची एटीएम कार्ड मिळाली. आरोपी राठोड याच्याकडे सुमारे 25 एटीएम कार्ड सापडली. त्यांच्याकडून नऊ लाख 50 हजार रुपये, एकूण 50 एटीएम, धनादेश आणि 11 मोबाईल पोलिसांनी जप्त केले.