कल्याणमधील वाहतूक कोंडी दूर करायची कशी? 

रविंद्र खरात
गुरुवार, 27 जुलै 2017

कल्याण : 'रोज सकाळी व संध्याकाळी शहरातील वाहतूक कोंडीमुळे शहरातील कर्मचारी वर्ग त्रस्त झाला आहे. त्यात वेळेवर बस किंवा रिक्षा मिळत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी 'केडीएमटी' आणि वाहतूक पोलिस एकत्र येऊन काम करणार आहेत', अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समितीचे सभापती संजय पावशे यांनी दिली. 

कल्याण व डोंबिवली येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरातून लाखो प्रवासी कामानिमित्त मुंबईला जातात. सकाळी व सायंकाळी या भागात वाहतूक कोंडीचा त्रास होतो. या समस्येवर रिक्षा किंवा केडीएमटीची बस न मिळाल्याने होणाऱ्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी आज (गुरुवार) सायंकाळी सभापती पावशे यांच्या दालनात महत्त्वाची बैठक झाली. यात व्यवस्थापक देविदास टेकाळे, संदीप भोसले, परिवहन सदस्य कल्पेश जोशी, राजेंद्र दीक्षित, मधुकर यशवंतराव, मनोज चौधरी, संजय राणे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबजी आव्हाड, पोलिस निरीक्षक संभाजी जाधव, एस. एन. जाधव, गोविंद गंभीरे आदी उपस्थित होते. 

डोंबिवली व कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील बस स्टॉपवर खासगी बस, रिक्षा, टॅक्‍सी, फेरीवाले यांचे अतिक्रमण झाल्याने बसेन स्टॉपवर न थांबता दुसरीकडे थांबते. यामुळे प्रवासी वर्ग खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे वळतात. ही समस्या दूर करण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली. 

'वाहतूक पोलिस आणि 'केडीएमटी'च्या अधिकाऱ्यांमध्ये अशा स्वरूपाची बैठक प्रथमच झाली. दोन्ही विभागांनी आपल्या समस्या मांडल्या. कल्याण व डोंबिवलीमधील नागरिकांना रेल्वे स्थानक गाठण्यासाठी किंवा घरी जाण्यासाठी होणारा त्रास दूर करण्यासाठी दोन्ही विभाग एकत्र काम करणार आहेत. दर महिन्याला अशा बैठका होणार आहेत', अशी माहितीही पावशे यांनी दिली.