अमित शहांच्या विनंतीनुसार कोविंदांना पाठिंबा 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 जुलै 2017

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एनडीएच्या काळात झालेल्या प्रगतीचा या वेळी आढावा घेतला. रविवारी (ता.16) सकाळी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या वेळी आमदारांना मतदान करण्याविषयी मार्गदर्शन केले जाईल.

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विनंतीनुसार शिवसेनेने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी सांगितले.

शिवसेना-भाजपच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे सर्व आमदार-खासदार उपस्थित होते. एकनाथ शिंदे हे विधिमंडळातील गटनेते 'समृद्धी'च्या कार्यक्रमाला गेल्यामुळे शनिवारी सकाळी गरवारे क्‍लबमधील या बैठकीत देसाई यांनी पक्षाची भूमिका मांडली. शिवसेनेचे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य अनंत गीतेही या वेळी उपस्थित होते. 

एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या पारड्यातील सर्वाधिक मते महाराष्ट्राची असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सत्ताधारी गटाच्या या बैठकीत जाहीर केले. आमदारांकडे मते मागण्यासाठी कोविंद मुंबई दौऱ्यावर आले होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी शनिवारी महाराष्ट्र व गोव्याचा दौरा केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी न जाता कोविंद यांनी दूरध्वनीवरून ठाकरे यांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत असलेले बलशाली आणि शिक्षित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यावर आपला भर असेल. राष्ट्रपतिपदाचा गौरव वाढवणे; तसेच भारताच्या सन्मानाला साजेसे वर्तन करणे याला आपले प्राधान्य असेल, असे रामनाथ कोंविद म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांनीही या वेळी एनडीए सरकारने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. दलित समाजातील व्यक्‍तीने राष्ट्रपतिपदावर बसणे हा गौरव आहे. मोदी यांनी केलेली निवड सर्वार्थाने योग्य आहे, असे आठवले म्हणाले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एनडीएच्या काळात झालेल्या प्रगतीचा या वेळी आढावा घेतला. रविवारी (ता.16) सकाळी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या वेळी आमदारांना मतदान करण्याविषयी मार्गदर्शन केले जाईल. 

राणांच्या नेतृत्वाखाली अपक्षांचा पाठिंबा 
कोविंद यांच्या उमेदवारीला शनिवारी रवी राणा यांच्या नेतृत्वाखालील अपक्ष आमदारांनीही पाठिंबा घोषित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विश्‍वासामुळे आम्ही एनडीएचे समर्थक झालो आहोत, असे सांगत या वेळी अपक्षांनी कोविंद यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव केला. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतरही अपक्षांचा फडणवीस सरकारला पाठिंबा राहील, असे राणा यांनी स्पष्ट केले.