डोंबिवलीतील 47 कुटुंबांचे पुनर्वसन 

सुचिता करमरकर
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

कल्याण : डोंबिवलीच्या पश्‍चिम भागातील नागूबाईल निवास इमारतीतील 47 कुटुंबांना आज (बुधवार) कचोरे येथील बी. एस. यू. पी. प्रकल्पातील रिकाम्या घरांमध्ये पुनर्वसित करण्यात आले. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कुटुंबांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. या कुटुंबांना येथे 90 दिवस राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

कल्याण : डोंबिवलीच्या पश्‍चिम भागातील नागूबाईल निवास इमारतीतील 47 कुटुंबांना आज (बुधवार) कचोरे येथील बी. एस. यू. पी. प्रकल्पातील रिकाम्या घरांमध्ये पुनर्वसित करण्यात आले. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कुटुंबांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. या कुटुंबांना येथे 90 दिवस राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

गेले तीन-चार दिवस रात्र रस्त्यावर काढल्यानंतर आज या कुटुंबांना आसरा मिळाला. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पालकमंत्री शिंदे यांनी ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर तातडीने या कुटुंबांना घरांचा ताबा देण्यात आला. मंगळवार सायंकाळपर्यंत ज्या 47 रहिवाशांनी घरासाठी अर्ज केले होते, त्यांना आज ताबा देण्यात आला. उर्वरित कुटुंबांनाही येत्या दोन दिवसांत घरांचा ताबा दिला जाईल, असे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले. 

पालिकेच्या विविध प्रकल्पांतील तसेच रस्ता रुंदीकरणातील बाधितांचे पुनर्वसन पालिका हद्दीत बांधून रिकाम्या स्थितीत असलेल्या बी. एस. यू. पी. प्रकल्पातील घरांमध्ये करावे, यासाठी पालिकेने वर्षभरापूर्वीच राज्य सरकारला विनंती केली होती. मात्र, यावर कोणताही धोरणात्मक निर्णय न झाल्याने ही घरे वापराविना पडून आहेत. या घरांचा ताबा 90 दिवसांसाठी देण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर देवळेकर, शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव, सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक विश्‍वनाथ राणे, दिपेश म्हात्रे, भाजपच्या नगरसेविका मनीषा धात्रक उपस्थित होते. रहिवाशांनी पेढे वाटप करून आपला आनंद व्यक्त केला. 

शिवसेनेच्या नगरसेवकांनी आणि पालकमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज आम्हाला छप्पर मिळत आहे. 
- संजय पवार, रहिवासी 

माझं घर चौथ्या मजल्यावर आहे. तिथून मी फक्त काही महत्त्वाची कागदपत्रे आणि दागिने बाहेर आणू शकलो आहोत. इतर सर्व सामान तिथेच सोडावे लागले आहे. आज घर तर मिळाले; पण अगदी चमच्यापासून सर्व संसार पुन्हा उभा करावा लागेल. माझी आई, मुलगा आणि पत्नी बहिणीकडे आहेत. आज मुलाची शाळा सुरू झाली.. त्याला तिथूनच शाळेत पाठवले. 
- मिलिंद गावकर, रहिवासी 

माझा अर्ज नसल्यामुळे आज मला घर मिळाले नाही; पण ते मिळणार हे निश्‍चित! पण माझे डिसेंबरमध्ये लग्न झाल्यानंतर आई इथे एकटी राहू शकेल का, ही मला शंकाच आहे. त्यामुळे मी थोडी विचारात पडले आहे. 
- राशी सावला, रहिवासी