कल्याण रेल्वे यार्डाचा विकास आता लवकरच! 

कल्याण रेल्वे यार्डाचा विकास आता लवकरच! 

कल्याण : मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या रेल्वे मंत्रालयाने आता लोकलवरील ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या आदेशानुसार रखडलेली विविध कामे मार्गी लावली जाणार आहेत. यात देशभरातील 40 रेल्वे यार्डांचा विकासही होणार आहे. यात मुंबई उपनगरातील आठ यार्डांचा समावेश आहे. त्यात कल्याणचाही समावेश असल्याने कर्जत आणि कसारा येथील रेल्वे प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. 

कल्याण रेल्वे स्थानकामध्ये सध्या एकूण सात प्लॅटफॉर्म आहेत. दर तीन मिनिटांना एक लोकल किंवा मेल गाडी येथे दाखल होते. दरमहा 58 लाख प्रवासी येथून प्रवासी करू शकतात. यामुळे नेहमी वर्दळ असते. त्यात रेल्वे स्थानकामध्ये मेल/एक्‍सप्रेस किंवा लोकल शिरताना किंवा स्थानक सोडताना क्रॉसिंग असल्याने तीन ते पाच मिनिटे लोकल किंवा मेल गाडी सिग्नलजवळ पंचिंगसाठी थांबविली जात असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. यामुळे प्रवासी वर्गाचा वेळ वाचविण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण रेल्वे स्थानकाचे रिमॉडेलिंग करण्याचा प्रस्ताव बनविला असून तोदेखील लवकरच मार्गी लागणार आहे. 

कल्याण रेल्वे स्थानकावर ट्रॅक, क्रॉसओव्हर्स आणि प्लॅटफॉर्मच्या पुनर्रचनेची योजना आखण्यात आली आहे. 

बाहेर गावाहून येणाऱ्या अनेक गाड्या कल्याणमधून मुंबईतील सीएसटीएम स्थानक आणि कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत चालविल्या जातात. त्यात बदल करत नव्याने धावणाऱ्या मेल गाड्या मुंबईत न आणता फक्त कल्याणपर्यंत आणल्या जातील. मुंबई किंवा कुर्लापर्यंत महत्त्वाच्या आणि निवडक गाड्याच आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. यासाठी कल्याण रेल्वे स्थानक आणि कल्याण पूर्वमधील रेल्वे यार्डातील मोकळ्या जागेचा वापर करत मेल गाड्या थांबविण्यासाठी नव्याने प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे. यामुळे लोकल आणि मेल गाड्यांचा मार्ग वेगळा होणार आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचेही रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. 

'रेल्वे क्रॉसिंग मार्गाचे जाळे कमी करा' आणि 'मेल गाड्या कल्याणपर्यंतच चालवा; जेणेकरून लोकल मार्ग सुकर होईल' अशी प्रवासी संघटनांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. कल्याण यार्ड डेव्हलप करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रेल्वे मंत्री आणि अधिकारी वर्गाचे आम्ही अभिनंदन करतो, अशी माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव श्‍याम उबाळे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com