बेशिस्त चालकांविरोधात तक्रार केल्याने महिला रिक्षा चालकास मारहाण 

रविंद्र खरात
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

कल्याण : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला रिक्षा चालकांना परमिट दिले असले; तरीही आता महिला रिक्षाचालकही असुरक्षित असल्याचे चित्र कल्याणमध्ये दिसून आले. बेशिस्त रिक्षा चालकांची तक्रार केल्याने काही जणांनी एक महिला रिक्षा चालक आणि तिच्या पतीला मारहाण केली. ही घटना काल (शुक्रवार) रात्री घडली. 

शहरांमध्ये रिक्षा चालकांकडून महिला प्रवाशांना होणारा त्रास दूर करण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह अन्य शहरांमध्येही महिलांना रिक्षा परमिट देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला कल्याणमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. या योजनेंतर्गत येथील शारदा ओव्हाळ यांनी रिक्षा परमिट घेतले होते. 

बिर्ला कॉलेज येथील रिक्षा स्टॅंडवर ओव्हाळ रिक्षा लावून प्रवासी वाहतूक करतात. येथील काही रिक्षा चालक बेशिस्तपणे रिक्षा चालवित असल्याने ओव्हाळ यांनी त्यांच्याविरोधात कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्याचा राग मनात धरून काही रिक्षा चालकांनी काल रात्री आठच्या सुमारास रिक्षा स्टॅंडवर ओव्हाळ यांना गाठले. त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केल्याने ओव्हाळ यांनी तातडीने त्यांच्या पतीला बोलावून घेतले. त्यांचे पती प्रवीण ओव्हाळ यांनाही त्या रिक्षा चालकांनी मारहाण केली. 

एवढ्यावरच न थांबता या रिक्षा चालकांनी ओव्हाळ यांच्या रिक्षेची तोडफोडही केली. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.