गोविंदांची सुरक्षा वाऱ्यावर; न्यायालयाच्या सुरक्षा सूचना धाब्यावर 

File photo
File photo

मुंबई : दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी न्यायालयाने सुचवलेल्या बहुतेक उपाययोजनांना आयोजक आणि गोविंदा पथकांनी गंभीरपणे घेतले नसल्याचे चित्र मंगळवारी (ता. 15) दहीहंडी उत्सवात दिसले. हेल्मेट वगळता अन्य सुरक्षा उपायांबाबत सर्वत्र उदासीनता आढळली. 

दहीहंडीखाली खाली चटई, वरच्या थरांतील गोविंदांना हेल्मेट, लाईफ जॅकेट, एक्‍क्‍यांसाठी दोरी आदी सुरक्षा उपाय करण्याच्या सूचना न्यायालयाने गोविंदा पथकांना आणि आयोजकांना केल्या होत्या; मात्र दहीहंडी फोडणाऱ्या एक्‍क्‍यांना हेल्मेटशिवाय अन्य कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवली नसल्याचे अनेक दहीहंडी उत्सवात आढळले. बोटावर मोजता येतील एवढ्या पथकांनी आणि आयोजकांनी न्यायालयाच्या सूचना पाळल्या. 

यंदाच्या दहीहंडीमध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळले जातील, गोविंदांच्या सुरक्षेला सर्वाच्च महत्त्व असेल, अशी हमी आयोजक, राजकीय पक्ष, दहीहंडी समन्वय समिती आणि पथकांनीही दिली होती. परंतु अनेक ठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचे आढळत होते. दादरची आयडियल दहीहंडी वगळता इतर ठिकाणच्या दहीहंड्यांच्या ठिकाणी सुरक्षा चटयांची व्यवस्था नव्हती. यंदा थर लावण्यावर निर्बंध नव्हते. तरीही आयोजकांनी आणि दहीहंडी पथकांनी संयम बाळगला. गोविंदा पथके सात ते आठ थरच लावत होती. 

बिले पद्धतीकडे पाठ 
खालचे थर कोसळले तरीही वरच्या थरावरील गोविंदा वरच्या वर उचलला जाईल अशा बिले पद्धतीचा प्रचार रत्नाकर कपिलेश्‍वर अनेक वर्षांपासून करत आहेत; मात्र अभ्युदयनगर, वरळी, प्रभादेवी अशा मोजक्‍याच ठिकाणी आयोजकांनी कपिलेश्‍वर यांना आमंत्रित केले होते. अन्य आयोजकांनी याबाबतीत उदासीनता दाखवल्याची खंत कपिलेश्‍वर यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com