दररोज 250 ठिकाणी सापडतात डेंगीच्या अळ्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

मुंबई : महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने केलेल्या पाहणीत मुंबईत दररोज 250 ठिकाणी डेंगीच्या अळ्या आणि 70 ते 80 ठिकाणी हिवतापाच्या डासांच्या अळ्या सापडत आहेत. डेंगीच्या डासांच्या अळ्या विशेषत: पाण्याच्या टाक्‍यांमध्ये आढळत असल्याने कीटकनाशक विभागाने या टाक्‍या झाकण्यासाठी खास झाकणे तयार केली आहेत. 

कीटकनाशक विभागाने केलेल्या पाहणीत आतापर्यंत 15 हजारांपेक्षा अधिक ठिकाणी डेंगीच्या एडिस डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. मुंबईत दररोज 250 ठिकाणी डेंगीच्या अळ्या आणि 70 ते 80 ठिकाणी हिवतापाच्या डासांच्या अळ्या सापडतात. हे दोन्ही प्रकारचे डास स्वच्छ पाण्यात आढळतात. घराबाहेर ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्‍यांमध्येही या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. यावर उपाय म्हणून कीटकनाशक विभागाने टाक्‍यांसाठी खास झाकणे तयार केली आहेत. 
नागरिकांना सूचना केल्यानंतरही टाक्‍या बंद करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे झाकणे महत्त्वाचे ठरणार आहेत, असे कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारींग्रेकर यांनी सांगितले. धारावीतील काही भागांत अशी झाकणे प्रायोगिक तत्त्वावर वाटप केली आहेत. त्याचा चांगला परिणाम दिसत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पालिकेची विशेष आरोग्य मोहीम 
मुंबईत मंगळवारी पूरसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली होती. या पाण्यात खूप वेळ राहिलेल्या नागरिकांना लेप्टोची लागण होण्याची भीती आहे. त्यामुळे पालिकेने आरोग्य मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत दोन लाख 50 हजार डॉक्‍सीलाईन गोळ्यांचे नागरिकांना वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर डासांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी धूरफवारणीही सुरू केली आहे.