दिग्दर्शक कुंदन शहा यांचे मुंबईत निधन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

मुंबई : 'नुक्कड' आणि 'वागले की दुनिया' अशा लोकप्रिय मालिका आणि 'जाने भी दो यारो', 'कभी हा कभी ना' आदी चित्रपटांचे दिग्दर्शक कुंदन शहा (वय 69) यांचे शनिवारी (ता. 7) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पुण्यातील फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात त्यांनी शिक्षण घेतले होते. 1983 मध्ये 'जाने भी दो यारो' या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. आजही हा चित्रपट लोकप्रिय आहे. त्यांना या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला 1993 मध्ये प्रदर्शित झालेला 'कभी हा कभी ना' हाही त्यांचा गाजलेला चित्रपट. त्यानंतर शहा यांनी 'क्‍या कहना', 'दिल है तुम्हारा', 'खामोश', 'हम तो मोहब्बत करेगा', 'एक से बढकर एक' या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. 2014 मध्ये प्रदर्शित झालेला 'पी से पीएम तक' हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता. 

कुंदन शहा यांनी 'नुक्कड', 'वागले की दुनिया' अशा लोकप्रिय मालिकांद्वारे सर्वसामान्यांचे जगणे छोट्या पडद्यावर अत्यंत परिणामकारक पद्धतीने मांडले होते. देशात वाढणाऱ्या असहिष्णुतेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करीत त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारही परत केला होता.