ठाणे स्थानकाला लाभणार एलईडीचा साज

Representational Image
Representational Image

ठाणे : ऐतिहासिक ठाणे स्थानकाला स्टेशन मास्तरसह आता स्टेशन डायरेक्टर लाभल्याने प्रवाशांच्या हिताच्या बाबींना प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. नवनियुक्त स्टेशन डायरेक्टर सुरेश व्ही. नायर यांनी कारभार हाती घेतल्यानंतर स्थानक परिसरातील अतिक्रमणे आणि अवैध पार्किंग हटवून लाखो प्रवाश्यांना दिलासा दिल्यानंतर आता स्थानकातील पायाभूत सुविधा आणि इतर सोयीसुविधांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

त्यानुसार, ठाणे स्थानकातील जुने साधे विद्युत दिवे हटवून त्याजागी आता एलईडी दिव्यांच्या प्रकाशाची झळाळी स्थानकाला लाभणार आहे. नव्या एलईडी दिव्यांच्या झगमगाटामुळे रात्रीही स्थानक उजळणार असून रेल्वेच्या खर्चासह वीज बचतदेखील होणार आहे.

ठाणे स्थानकातून दररोज सुमारे सात लाख प्रवाशी प्रवास करत असल्याने मध्य रेल्वेच्या मार्गावरील हे स्थानक सर्वाधिक वर्दळीचे स्थानक बनले आहे. तर, रेल्वेला सर्वाधिक महसूल मिळवून देऊनही ठाणे स्थानकातील सोयीसुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध केला जात नसल्याचा आरोप नेहमीच होत असतो.

ठाणे स्थानकात दहा फलाट असून येथून मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्यांसह वाशी- पनवेल मार्गावर ट्रान्सहार्बर सेवाही प्रवाश्यांना पुरवली जाते. स्थानकातून बाहेरगावच्या गाड्यांची वर्दळ हेरून नुकतेच फलाट क्रमांक 5 व 6 वरील पारंपारिक इंडिकेटर बदलून त्याजागी हायडेफिनेशन (एचडी) दर्जाचे सुस्पष्ट अक्षरे दर्शविणारे इंडिकेटर बसवण्यात आले. त्यानंतर आता स्टेशन डायरेक्टर सुरेश व्ही. नायर यांच्या पुढाकाराने प्रवाशांच्या सुविधांकडे प्राधान्याने लक्ष दिले जात असून यासाठी,रेल्वे प्रशासनाकडून स्थानकात विविध उपक्रम राबवले जात आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या वीज बचतीच्या उपक्रमांतर्गत सर्वच क्षेत्रात एलईडी दिव्यांचा वापर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार,स्थानकातील सर्व जुनाट विद्युत दिवे बदलून स्थानकात आता एलईडी दिव्यांचा झगमगाट दिसणार आहे. त्यामुळे वीज बचत होणार असून रेल्वेच्या दैनंदिन खर्चालाही यामुळे काहीसा लगाम लागणार आहे.

आधीच्या विद्युत दिव्यामुळे विजेचे भरमसाठ येणारे वीजबिल या एलईडी दिव्यांमुळे घटणार असून या एलईडी दिव्यांमुळे रात्रीच्यावेळेस दिवसाप्रमाणे स्थानकावर उजेड पसरणार आहे. किंबहुना प्रवाशांच्या दृष्टीलाही या एलईडी दिव्यांमुळे त्रास होणार नाही.अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
 
ठाणे स्थानकातील सर्व विद्युत दिवे जुनाट झाले असून गेले कित्येक वर्षे हे दिवे बदलले गेलेले नाहीत. यातील काही दिवे बंद अवस्थेत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तसेच पंतप्रधानांनी सर्वत्र एलईडी दिव्यांसाठी आग्रह धरून वीजबचतीचा मूलमंत्र देशवासियांना दिला. या पार्श्वभूमीवर ठाणे स्थानकात एलईडी दिवे बसवण्यात येणार असून यासाठी निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार येत्या 24 नोव्हेंबर रोजी ठेकेदाराची नियुक्ती होणार होऊन नववर्षाच्या प्रारंभी हे काम पूर्ण होईल.
- सुरेश व्ही.नायर, ठाणे रेल्वे स्टेशन डायरेक्टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com