ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन 

वृत्तसंस्था
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

अभिनयाशिवाय लेखन आणि पत्रकारितेमध्येही टॉम अल्टर यांनी काम केले होते. 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरचे आंतरराष्ट्रीय पदार्पण होण्यापूर्वी टॉम अल्टर यांनी त्याची मुलाखत घेतली होती. त्यांनी एकूण तीन पुस्तकेही लिहिली. कला आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानामुळे 2008 मध्ये केंद्र सरकारने 'पद्मश्री' पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर (वय 67) यांचे काल रात्री मुंबईत निधन झाले. त्यांना त्वचेचा कर्करोग झाला होता. 

याच महिन्याच्या सुरवातीस टॉम अल्टर यांना मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या गुरुवारी त्यांना घरी सोडण्यात आले होते. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. 

अमेरिकी वंशाचे भारतीय अभिनेते म्हणून ओळख निर्माण केलेल्या टॉम अल्टर यांनी 1976 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी 300 हून चित्रपटांमध्ये काम केले. 1993 ते 1997 या कालावधीत प्रसारित झालेल्या 'जबान संभालके' या मालिकेमुळे टॉम अल्टर घराघरांत पोचले. याशिवाय 'शक्तिमान', 'कॅप्टन व्योम'सारख्या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. दूरचित्रवाणी आणि चित्रपटांशिवाय टॉम अल्टर यांनी हिंदी रंगभूमीवरही काम केले होते. 