प्रस्थापितांसमोर जव्हार प्रतिष्ठान-भाजप युतीचे आव्हान 

प्रस्थापितांसमोर जव्हार प्रतिष्ठान-भाजप युतीचे आव्हान 

मोखाडा : दोनच महिन्यांपूर्वी आपली चुणूक दाखविलेल्या जव्हार प्रतिष्ठान आणि भाजपची युती झाल्यामुळे जव्हार नगरपरिषदेच्या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. या भागात प्रस्थापित असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेसमोर जव्हार परिषद-भाजपच्या युतीने मोठे आव्हान उभे केले आहे. 

जव्हार नगर परिषदेची निवडणूक येत्या 13 डिसेंबर रोजी होणार आहे. नगरपरिषदेत 17 सदस्य आहेत; तर प्रथमच नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 18 नोव्हेंबरपासून सुरवात झाली आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवार याद्या निश्‍चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जव्हार प्रतिष्ठान आणि भाजपने युती करत या प्रस्थापितांसमोर आव्हान उभे केले आहे. या युतीमुळे जव्हारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्‍यता आहे. 

जव्हारमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि माकप हे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत. यापैकी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी आणि शिवसेना-भाजपची युती असे निवडणुकीमध्ये चित्र असायचे. मात्र, दोन महिन्यांपूर्वी जव्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत पाटील यांनी नगरपरिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत चार जागा जिंकून सर्वांनाच धक्का दिला होता. भरत पाटील हे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पाटील यांच्या जव्हार प्रतिष्ठानशी युती केली. याची अधिकृत घोषणा आज (सोमवार) करण्यात आली. यावेळी भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हरिश्‍चंद्र भोये, भाजपचे जव्हार शहराध्यक्ष कुणाल उदावंत आणि जव्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

आतापर्यंत सत्ता भोगलेल्या एकाही पक्षाने जव्हारचा विकास केलेला नाही. त्यामुळे जव्हारच्या विकासासाठी आम्ही जव्हार प्रतिष्ठानशी युती केली आहे. या युतीच्या माध्यमातून आम्ही जव्हारमध्ये विकासकामे करणार आहोत. 
- हरिश्‍चंद्र भोये, भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष 

या निवडणुकीत 'जव्हार विकास, हाच आमचा ध्यास' हा आमचा अजेंडा आहे. आम्ही भाजपला सहा जागा दिल्या असून 11 जागांवर आम्ही निवडणूक लढविणार आहोत. नगराध्यक्ष पदासाठी जव्हार प्रतिष्ठानचा उमेदवार असेल. 
- भरत पाटील, जव्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com