फेरीवाल्यांकडे सिलिंडर आढळल्यास गॅस कंपनीवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

मुंबई : बेकायदा फेरीवाल्यांकडे स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर आढळल्यास संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय आज महापालिकेने घेतला. वारंवार कारवाई केल्यानंतरही फेरीवाल्यांची संख्या कमी होत नसल्याने आयुक्त अजोय मेहता यांनी ही कठोर भूमिका घेतली. 

पालिकेने गेल्या वर्षी दीड लाखापेक्षा अधिक फेरीवाल्यांवर कारवाई केली होती, तर जून अखेरपर्यंत 35 ते 40 हजार फेरीवाल्यांवर कारवाई केली. फेरीवाल्यांवर कारवाई करताना पालिकेचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांना काही व्यक्तींनी मारहाण केली होती. या घटनेची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली आहे. वारंवार कारवाई केल्यानंतरही फेरीवाल्यांची संख्या कमी होत नसल्याने या फेरीवाल्यांच्या मुळावरच घाव घालण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

फेरीवाले बेकायदा व्यवसाय करत असतानाही त्यांच्याकडे स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर मिळत असल्याने आता सिलिंडर कंपनीवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी मासिक बैठकीत दिले. 

सिलिंडरचा काळाबाजार होणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. त्यामुळे कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे काळाबाजार कमी होऊन फेरीवाल्यांना सिलिंडर मिळणार नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.