कल्याण : ..तर परिवहन कर्मचारी सामूहिक रजेवर जातील 

रविंद्र खरात
बुधवार, 28 जून 2017

येथे कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा नाही; रात्री उशीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी वाहन नसल्याने आगारामध्येच रात्र काढावी लागेल; त्यावेळी झोपायलाही जागा नसल्याने बसमध्येच झोपण्याची वेळ येते; पिण्याच्या पाण्याची सोय नाही; शौचालय नाही; आजूबाजूला हॉटेलही नसल्याने जेवणाचा प्रश्‍नही उभा राहतो, अशा समस्या सरनोबत यांनी मांडल्या. 

कल्याण : 'मूलभूत सुविधा नसलेल्या आगारातून काम करण्याची जबरदस्ती केली, तर कल्याण डोंबिवली महानगर परिवहन उपक्रमाचे कर्मचारी सामूहिक रजेवर जातील', असा इशारा परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेना अध्यक्ष बुधाराम सरनोबत यांनी आज (बुधवार) दिला. 

पश्‍चिम कल्याणमधील कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आगारा'चे (वसंत व्हॅली) भूमिपूजन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 22 जानेवारी 2015 रोजी झाले होते. त्यानंतर दोन वर्षे झाली, तरीही आगाराचे काम पूर्ण झालेले नाही. कल्याण डोंबिवली मनपाचे तीन आगार आहेत. गणेश घाट येथील नूतनीकरण अंतिम टप्प्याअत आहे. डोंबिवलीमधील खंबाळपाडा आणि पश्‍चिम कल्याणमधील वसंत व्हॅली येथील नूतनीकरणाचे काम रखडलेले आहे. हे काम पूर्ण होण्याआधीच इथे 30 ते 35 बस उभ्या केल्या जातात. सध्या येथून पनवेल आणि वाशी मार्गावर साध्या व एसी बस सोडल्या जातात. आता येत्या 1 जुलैपासून 100 ते 120 कर्मचाऱ्यांना या आगारात काम लावण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर सरनोबत यांनी आज आगाराची पाहणी केली. येथे कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा नाही; रात्री उशीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी वाहन नसल्याने आगारामध्येच रात्र काढावी लागेल; त्यावेळी झोपायलाही जागा नसल्याने बसमध्येच झोपण्याची वेळ येते; पिण्याच्या पाण्याची सोय नाही; शौचालय नाही; आजूबाजूला हॉटेलही नसल्याने जेवणाचा प्रश्‍नही उभा राहतो, अशा समस्या सरनोबत यांनी मांडल्या. 

आगारामधील डांबरीकरण पूर्ण झालेले नसल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे बस आगाराच्या बाहेर उभ्या कराव्या लागतात. रात्री अज्ञात व्यक्ती त्या बसची तोडफोड करतात आणि या नुकसानाला कर्मचाऱ्यांनाच जबाबदार धरले जाते, असा आरोपही त्यांनी केला. 'आधी मूलभूत सुविधा द्या, तरच आमचे कर्मचारी काम करतील' अशी भूमिका सरनोबत यांनी घेतली आहे.