'मनसे'च्या 'त्या' नगरसेवकांबाबत महासभेत निर्णयाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांबाबत निवडणूक आयोगाकडून महापालिका आयुक्तांना पत्र आल्यानंतर त्याबाबत 27 ऑक्‍टोबरला महापालिकेच्या महासभेत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. या नगरसेवकांबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे, अर्चना भालेराव, परमेश्‍वर कदम, अश्‍विनी माटेकर, हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या नगरसेवकांनी प्रत्येकी पाच कोटी रुपये घेऊन पक्षांतर केले, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. भाजपचे खासदार किरीट सोमय्या आणि मनसेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. फुटीर नगरसेवकांची नोंदणी करू नये, अशी मागणी मनसेने कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे. मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी आपणास नगरसेवक दिलीप लांडे यांनी प्रलोभन दाखवल्याचा आरोप केला आहे. या पक्षांतरात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तुर्डे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. त्यामुळे फुटीर नगरसेवकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. 

पालिकेची महासभा 27 ऑक्‍टोबरला आहे. त्याआधी निवडणूक आयुक्तांकडून पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पक्षांतर केलेल्या नगरसेवकांबाबत पत्र येणार आहे. आयुक्त हे पत्र सभागृहासमोर मांडतील, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.