पालघर पोटनिवडणूकीसाठी राजकीय पक्षांनी दंड थोपटले

Election
Election

मोखाडा : पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, आता येथील पोटनिवडणूकीचे पडघम वाजु लागले आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहे. मात्र, एक वर्षाच्या कार्यकाळासाठी पोटनिवडणूक होऊ न देण्याचे मत काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्याचे आहे. असे असले तरी पक्षाचा आदेश आल्यास निवडणूक लढण्याची तयारी पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे पोटनिवडणूक जाहीर होण्यापुर्वीच राजकीय पक्षांनी मात्र निवडणूकीसाठी दंड थोपटले आहे. 

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. तर भंडारा लोकसभेचे खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा आणि भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने तेथील जागाही रिक्त झाली आहे. त्यामुळे राज्यातील पालघर आणि भंडारा या दोन लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूका पुढील महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामध्ये पालघर लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी सर्वात अगोदर दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा उत्तराधिकारी कोण? म्हणून भाजपमध्ये खल निर्माण झाला होता. भाजपकडून याबाबत स्पष्ट निर्णय न झाल्याने, तो आजही कायम आहे.

मात्र, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीने पालघर आणि वसई मध्ये बैठका घेऊन, पोटनिवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी वसईत, कार्यकर्त्यांच्या बैठकीत पोटनिवडणूकीसाठी तयारीला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करून पोटनिवडणूकीसाठी दंड थोपटले आहे. मात्र, भंडाऱ्याची राष्ट्रवादी काँग्रेसची जागा माजी खासदार नाना पटोले यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे, काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर त्या मोबदल्यात काँग्रेसकडील पालघरची जागा, राष्ट्रवादीला मिळेल असे राष्ट्रवादीकडून बोलले जात आहे. असे असले तरी काँग्रेस कडून येथील पोटनिवडणूकीसाठी माजी खासदार दामू शिंगडा व त्यांचे सुपुत्र सचिन शिंगडा यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीने मात्र, पक्षश्रेष्टींच्या निर्णयाची वाट बघण्याचा सावध पवित्रा घेतला आहे. तर भाजपकडून वनगांचा उत्तराधिकारी कोण असेल हे जाहीर केलेले नाही.  

दरम्यान, निवडणूक झाल्यास ती जिंकण्याच्या दृष्टीने लढविण्याचा निर्णय बहुजन विकास आघाडीने घेतला आहे. वर्षाच्या कालावधी साठी, श्रम, वेळ आणि पैसा खर्च होऊ नये आणि सर्वपक्षीय समझोता झाल्यास, या सर्व बाबी वाचणार असल्याची भूमिका बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सकाळला माहिती देताना मांडली आहे.

मागील निवडणुकीत मोदी लाट होती, आता तशी लाट राहिलेली नाही. तर मतदार संघात वाढलेल्या नवीन मतदारांचा आम्हला निश्चितच फायदा होणार असल्याचे ही ठाकूर यांनी सकाळला सांगितले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे 1 लाख   46 हजार नवीन मतदारांची वाढ झाली आहे. त्यामध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या बोईसर - 11792, नालासोपारा - 81087   आणि वसई - 4301 असे एकूण - 97180  नव्याने मतदार वाढले आहेत. तर  सन 2014  मध्ये नव्याने निर्माण झालेल्या पालघर लोकसभेवर बहुजन विकास आघाडीने आपला खासदार निवडून प्रतिनिधीत्व केले होते. त्यामुळे पोटनिवडणूक झाल्यास अथवा 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बदल घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. मात्र, आगामी निवडणुका स्वतंत्र स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आदेश आल्यास, निश्चितच पोटनिवडणूक लढविली जाईल असे शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा यांनी सांगितले आहे. शिवसेनेने सोडलेली साथ, वाढीव मतदार आणि वनगांसारखाच लोकप्रिय उत्तराधिकारी न मिळाल्यास भाजपला पोटनिवडणूक आणि 2019 ची सार्वत्रिक निवडणुक खडतर जाणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीबाबत वरिष्ठ स्तरावर बैठक झाली आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी पक्षश्रेष्टी आदेश देतील त्या पध्दतीने आम्ही कामाला लागू, असे पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल भुसारा यांनी सांगितले.
पालघर पोटनिवडणूकीसाठी आमच्या पक्षाची कोअर कमिटी उमेदवार निश्चित करेल. पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याला निवडून आणण्याचे काम पालघर जिल्हा भाजप करणार असल्याचे आमदार पास्कल धनारे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com