मुंबईची जीवनवाहिनी सुसाट!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईतील जीवनवाहिनीच्या वाट्याला काय येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गत वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. देशभरातील रेल्वेसेवेसाठी एक लाख 48 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यात मुंबईतील रेल्वे विकासासाठी 51 हजार कोटी रूपये देण्यात आले आहेत. यामुळे "एमयूटीपी-3' आणि "एमयूटीपी-3 ए' अंतर्गतचे प्रकल्प मार्गी लागणार आहेत.

लोकलचा विस्तार वाढवण्यावर सरकारने भर दिला आहे. मुंबई उपनगरी लोकलच्या 150 कि.मीच्या नवीन मार्गांसाठी 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात उन्नत मार्गाचाही समावेश असेल. 90 कि.मी रुळांच्या दुहेरीकरणासाठी 11 हजार कोटी रूपये अतिरिक्त देण्यात आले आहेत. लोकल वेळेत धावावी यासाठी रुळांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त 11 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. "मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' या प्रकल्पासाठी आवश्‍यक बाबी पूर्ण करण्याचे काम हाती घेतले जाईल. बडोदा येथे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वेचा विस्तार झाल्यास लोकलवरील ताण कमी होईल आणि प्रवास सुकर होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

मुंबईला वेगळे काय देण्यात आले? याचा स्पष्ट उल्लेख अर्थसंकल्पात नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. गतवर्षीही बायोटॉयलेटची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसताना पुन्हा तीच घोषणा केली गेली.
- वंदना सोनावणे, अध्यक्ष, महिला प्रवासी संघटना

विद्युतीकरण अन्‌ दुहेरीकरण
मध्य रेल्वेच्या 359 कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यात मिरज-पंढरपूर (138 कि.मी.), जासई-उरण (10 कि.मी.), पेण-रोहा (67 कि.मी), पनवेल-पेण-थाल (75 कि.मी.), जासई-जेएनपीटी (9 कि.मी.), भिगवण-वाशिंबे आणि गुलबर्गा-अक्कलकोट रोड (60 कि.मी.) आदी मार्गांचा समावेश आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण-टिटवाळा (10.84 कि.मी.) या मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे.

Web Title: marathi news mumbai news railway central budget