संमेलनाच्या खर्चासाठी गुजरातच्या अनुदानाकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

मुंबई - साहित्य संमेलनामध्ये होणाऱ्या खर्चावर मर्यादा घालून केवळ साहित्यिक दृष्टीने चांगले उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा सर्व पातळ्यांवरून व्यक्त केली जात आहे; मात्र यंदा संमेलनाच्या खर्चाची हातमिळवणी होत नसल्याने गुजरात सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाकडे आयोजकांचे लक्ष लागले आहे.

91 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन फेब्रुवारीमध्ये बडोदा येथे होणार आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकारच्या वतीने 25 लाखांचे अनुदान आयोजक संस्थेला देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पी. डी. पाटील यांनीही संमेलनाला काही निधी दिला आहे. महाराष्ट्र बॅंक आणि सारस्वत बॅंकेकडेही संमेलनाच्या प्रायोजकत्वाबाबत चर्चा सुरू आहे. बडोद्यात संमेलन होणार असल्याने गुजरात सरकारकडे 50 लाख रुपयांचे अनुदान आयोजकांनी मागितले आहे; परंतु अजून गुजरात सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. आयोजकांकडे असलेल्या पैशांत कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू आहे; मात्र शामियाना उभारण्यापासून ते भोजनाच्या सोईपर्यंतच्या खर्चासाठी निधीची आवश्‍यकता आहे.

आयोजकांच्या वतीने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा साहित्य संमेलनासाठी निधी देण्याची मागणी करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाचे सोहळे बंद करा. जेवणावळींऐवजी साहित्याच्या दृष्टिकोनातून अधिक गंभीर आणि व्यापक अशा चर्चांवर भर दिला जावा, अशी मागणीही साहित्य वर्तुळातून पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे.

Web Title: marathi news mumbai news sahitya sammelan subsidy gujrat