नवी मुंबईत आज होणार रंगतदार सोहळा, महिलांची उत्सुकता शिगेला

नवी मुंबईत आज होणार रंगतदार सोहळा, महिलांची उत्सुकता शिगेला

मुंबई - स्वतःबरोबरच समाजाचीही प्रगती साधण्याचे कर्तृत्व दाखवणाऱ्या महिलांना शुक्रवारी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ-वूमन इम्पॅक्‍ट ॲवॉर्ड’ने गौरवण्यात येणार आहे. नवी मुंबईत वाशीतील सिडको एक्‍झिबिशन सेंटरमध्ये ताऱ्यांच्या उपस्थितीत या स्त्रीशक्तीचे कौतुक करण्यात येईल. सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या रंगतदार सोहळ्यात, पुरस्कारविजेत्या कोण ठरणार, याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे.

गायिका वैशाली सामंत, ‘नटरंग’फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, अभिनेता पुलकित सम्राट, वैभव तत्ववादी यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात आव्हानांवर लीलया मात करत कौटुंबिक, सामाजिक, औद्योगिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तृत्वाचा झेंडा फडकावणाऱ्या भगिनींना ‘सकाळ-वूमन इम्पॅक्‍ट ॲवॉर्ड’ने गौरवले जाणार आहे. त्याचबरोबर या वेळी गायक मंगेश बोरगावकर, गायिका जुईली जोगळेकर, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, तन्वी पालव, श्‍वेता पवार आपले नृत्य आणि गानकर्तृत्वही दाखवतील.

या वेळी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांत २१ व्या शतकातील कुटुंब आणि समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी धडपडणाऱ्या मातेसाठीचे ‘भारती पारितोषिक, लोककल्याण; तसेच दारिद्र्यनिर्मूलनासाठी झटणाऱ्या महिलेसाठीचे ‘शिक्षण पारितोषिक’, भू-वायू आणि जलप्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या भगिनीसाठीचे ‘जबाबदार वापर पारितोषिक’, भू-वायू आणि जलप्रदूषणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलेसाठीचे ‘जबाबदार उत्पादन पारितोषिक’, नवोन्मेषी कामासाठीचे ‘नवोन्मेष किंवा स्टार्टअप पारितोषिक’ यांचा समावेश आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तसेच ‘स्वच्छ’ ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महिलांनाही या वेळी विशेष पुरस्काराने गौरवले जाणार आहे. स्त्री शक्तीला बळ देणारा हा सोहळा सर्वांसाठी खुला आहे.

परीक्षकांच्या मते...
‘सकाळ’च्या निकषांनुसार आम्ही ‘समाजसेविका’ निवडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पुरस्कारांसाठी अनेकांनी अर्ज, त्यांच्या कार्याची छायाचित्रे, मिळालेल्या पुरस्कारांच्या प्रती आदी अर्जासोबत जोडल्या होत्या. याद्वारे समाज घडवण्यासाठी केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची माहिती मिळत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांवरील अन्याय आणि अत्याचारावर केवळ चर्चा करण्यापेक्षा संकटांचा सामना करीत समाजसेवेचे व्रत सुरू ठेवणाऱ्या महिलेच्या कार्याला योग्य न्याय देण्याचा उपक्रम ‘सकाळ’ राबवत आहे.
- जयश्री काटकर, एचआरप्रमुख, आयआर, दीपक फर्टिलायझर

पुरस्कारांसाठी आलेल्या अनेक अर्जांमधून एकाची निवड करणे खरेच कठीण काम होते. महिलांनी राज्यभरात अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. ‘सकाळ’चा उपक्रम खरेच अशा महिलांना प्रोत्साहन देणारा आहे. केवळ आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना फायदा न होता खऱ्या अर्थाने समाजाला फायदा होणारे कार्य म्हणजेच समाजसेवा आहे. अशाच महिलांना निवडण्याचा आम्ही आटोकात प्रयत्न केला आहे. पुरस्कारासाठी निवड करताना ग्रामीण व शहरी अशा दोन्ही बाजू आम्ही पाहत होतो. यात ग्रामीण महिला शहरी महिलेपेक्षा अधिक वरचढ वाटल्या. या पुरस्काराने नक्कीच अशा महिलांना भरारी मिळेल.
- दिव्या गायकवाड, सभापती,पर्यावरण समिती, नवी मुंबई महापालिका

पुरस्कारासाठी तुम्ही कशाप्रकारे काय मांडणी करता हे महत्त्वाचे नसून तुम्ही केलेले कार्य महत्त्वाचे आहे. तेच तुमचे कर्तृत्व सिद्ध करते. अशा अनेक महिला समाजकार्याद्वारे राज्याच्या कानाकोपऱ्यात दिवस-रात्र झटत असल्याचे पुरस्कारांसाठी आलेल्या अर्जांद्वारे लक्षात आले. याचा खूप आनंदही झाला की आजही एक महिला अनेक महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी धडपडत आहे. ‘सकाळ’ने अशा महिलांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे.
- वृषाली मगदूम, सामाजिक कार्यकर्त्या

‘सकाळ वूमन इम्पॅक्‍ट ॲवॉर्ड’साठी आलेल्या नामांकनांतून पुरस्कारविजेते निवडताना खूपच कस लागला. कारण पुरस्कारासाठी अर्ज करणारी प्रत्येक महिला वेगवेगळ्या कार्यात एकमेकींपेक्षा उजवी ठरत होती. त्यामुळे एकीची निवड करताना दुसरीवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याची कसरत करावी लागली. शहरी आणि ग्रामीण भागांत अशा अनेक समस्या आहेत, ज्यांची आपल्याला कल्पनाही नाही, याची जाणीव राज्यभरातील महिलांचे अर्ज पडताळताना झाली. ज्यांच्या कार्यामुळे समाजात बदल घडत आहेत, ज्यांच्या शिक्षणामुळे विद्यार्थी घडत आहेत, अशांची निवड करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
- योगिनी चौक, मराठी अभिनेत्री

‘सकाळ वूमन इम्पॅक्‍ट ॲवॉर्ड’साठी आलेले महिलांचे अर्ज पडताळणीची संधी मिळाली आणि अनेक मान्यवर महिलांची त्यानिमित्त भेट झाली. त्यामुळे या उपक्रमात सहभागी होऊन खूपच आनंद झाला. राज्यभरात खूप महिला आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व्यापक स्वरूपात सामाजिक कार्य करीत आहेत. अशा महिलांना भेटण्याचा अनुभव आगळावेगळा आहे.
- वीणा शेट्टी, एचआर मॅनेजर, सकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com