त्या 27 गावात सर्वेक्षण केल्यास कार्यालयाला टाळे लावू; सर्व पक्षीय युवा मोर्चाचा इशारा

संजीत वायंगणकर
बुधवार, 12 जुलै 2017

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील समाविष्ट झालेल्या 27 गावांना महानगरपालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या सर्व पक्षीय संघर्ष युवा मोर्चाने या 27 गावात कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण केल्यास महानगरपालिकेच्या ई-प्रभाग कार्यालयाला टाळे लावू, असा इशारा दिला आहे.

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील समाविष्ट झालेल्या 27 गावांना महानगरपालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या सर्व पक्षीय संघर्ष युवा मोर्चाने या 27 गावात कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण केल्यास महानगरपालिकेच्या ई-प्रभाग कार्यालयाला टाळे लावू, असा इशारा दिला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 27 गावांचा समावेश होऊन दीड वर्षे उलटले आहे. ही गावे पालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी संघर्ष समिती जोरदार प्रयत्न करीत आहे. मात्र या गावातून निवडून आलेल्या 21 नगरसेवकांना मात्र या गावांचा विकास महापालिकेतच होऊ शकतो असे ठामपणे वाटते. आता या गावात पालिकेने सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. परंतू सर्व पक्षीय युवा मोर्चाने या सर्वेक्षणाला कडाडून विरोध केला आहे. जर गावात पालिकेने सर्वेक्षण केले तर पालिकेच्या "ई" प्रभाग कार्यालयाला टाळे लावू, असा इशारा समितीने प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रभाकर पवार यांना दिला आहे.

सर्व पक्षीय युवा मोर्चाचे माजी सरपंच रवींद्र पाटील, गजानन पाटील यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रभाकर पवार यांची भेट घेतली. पवार यांना निवेदन दिल्यानंतर 27 गावाबाबत चर्चा केली. पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 27 गावातील नागरिकांच्या भावनांचा आदर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये 7 सप्टेंबर 15 रोजी अधिकृत प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करुन केडीएमसीत समाविष्ट असलेली 27 गावे पुन्हा वगळून त्याची स्वतंत्र नगरपालिका, नगरपरिषद स्थापन करण्यात येईल. शासन दरबारी या सत्तावीस गावांचा प्रश्न प्रलंबित असल्याने कुठल्याही प्रकारे सर्वेक्षण करू नये. यावेळी पवार यांनी आपली मागणी आणि निवेदन वरिष्ठांकडे पाठवू असे उत्तर दिले. मात्र सर्वेक्षणास सुरुवात केल्यास कार्यालयाला टाळे लावू असा इशारा संघर्ष युवा मोर्चाने दिला.