कल्याण: 'ई सकाळ'च्या बातमीमुळे केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्या सुविधा

रविंद्र खरात
रविवार, 2 जुलै 2017

मूलभूत सुविधा नसलेल्या आगारात काम करण्याची जबरदस्ती केल्यास कल्याण डोंबिवली महानगर परिवहनमधील (केडीएमटी) कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात "सकाळ'मध्ये वृत्त छापून आले होते. या वृत्ताची दखल घेत केडीएमटी प्रशासनाने "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आगारा'मध्ये (वसंत व्हॅली) कर्मचाऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

कल्याण : मूलभूत सुविधा नसलेल्या आगारात काम करण्याची जबरदस्ती केल्यास कल्याण डोंबिवली महानगर परिवहनमधील (केडीएमटी) कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात 'ई सकाळ'मध्ये  वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत केडीएमटी प्रशासनाने 'शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आगारा'मध्ये (वसंत व्हॅली) कर्मचाऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

केडीएमटीच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आगाराचे 22 जानेवारी 2015 रोजी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. दोन वर्षे झाले तरीही या आगाराचे काम पूर्ण झाले नव्हते. दरम्यान केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांना अर्धवट काम झालेल्या आगारामध्ये काम करण्यास सांगण्यात आले होते. त्यावर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आधी मूलभूत सुविधा द्या. अर्धवट अवस्थेतील आगारात काम करण्याची सक्ती केली तर कर्मचारी सामूहिक रजेवर जातील, असा इशारा परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेनेचे अध्यक्ष बुधाराम सरनोबत यांनी दिला होता. यासंदर्भात "सकाळ'मध्ये बातमी छापून आली होती. या बातमीची दखल घेत केडीएमटीचे महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी संबंधित आगाराला भेट दिली. तेथे कर्मचारी वर्गाला बसण्यासाठी केबीन, सामान ठेवण्यासाठी बॉक्‍स, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उभे राहण्यासाठी शेड, फिरते शौचालयाची व्यवस्था दिली. त्यामुळे कर्मचारी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

केडीएमटीचे एकूण तीन आगार आहेत. गणेशघाटमधील आगाराच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्यात असून डोंबिवलीमधील खंबाळपाडा आणि कल्याण पश्‍चिम मधील वंसतव्हॅली येथील आगाराच्या नूतनीकरणाचे काम प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे काम रखडले आहे. विशेष म्हणजे कल्याण पश्‍चिममधील वंसत व्हॅली येथील आगाराचे काम पूर्ण होण्या अगोदरच तेथे 30 ते 35 बसेस पार्क केल्या जातात. तेथून एसी बसेस आणि साध्या बसेस पनवेल आणि वाशी मार्गावर सोडल्या जातात. आता 1 जुलै 2017 पासून शंभर ते एकशे वीस कर्मचाऱ्याना तेथून ड्यूटी लावण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली होती.

वंसत व्हॅली आगार नूतनीकरणाचे काम आगामी सहा महिन्यात पूर्ण होईल तेव्हा सर्वच समस्या दूर होतील. मात्र, त्यापूर्वी तात्पुरत्या स्वरुपात या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून 1 जुलै ऐवजी 20 जुलैपासून कर्मचारी वर्गाला ड्यूटी देण्यात येईल.
- देवीदास टेकाळे, केडीएमटीचे महाव्यस्थापक