ठाण्यात बनावट कॉलसेंटर उघड 

ठाण्यात बनावट कॉलसेंटर उघड 

ठाणे - ठाण्यात आणखी एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला आहे. अमेरिकन नागरिकांना कर्जाचे प्रलोभन दाखवून कर्ज मंजूर न करता इंटरनेट तंत्राने प्रोसेसिंग फी उकळून फसवणूक करणाऱ्या दोघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली. राकेश कोडवाणी (21, रा. गुजरात) आणि जोरावत राजपूत (28, रा. राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

घोडबंदर रोडवरील इमारतीतील भाड्याच्या सदनिकेत महिनाभरापासून हे कॉलसेंटर सुरू होते. या दुकलीने 600 अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली. घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील उन्नती वूडस इमारतीच्या फेज 5 मधील चौथ्या मजल्यावरील भाड्याच्या सदनिकेमध्ये बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या वेळी फ्लॅटमध्ये राकेश कोडवाणी आणि जोरावत राजपूत हे दोघे इंटरनेट कॉलिंगद्वारे अमेरिकन नागरिकांना फोन करत असल्याचे आढळून आले. 

अमेरिकन नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून कर्जमंजुरीसाठी लागणारी प्रोसेसिंग फीची रक्कम डॉलरमध्ये उकळून फसवणूक करत होते. पोलिसांनी दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून आयफोनसह चार मोबाईल, दोन लॅपटॉप आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

600 अमेरिकन नागरिकांची यादी 
ठाणे पोलिसांनी गतवर्षी ठाणे, मीरा रोड येथील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. कोडवाणी हा बारावीत शिकत असून, त्याचा साथीदार राजपूत हा संगणक अभियंता आहे. हे दोघे चांगले इंगजी बोलत असल्याने आधुनिक सॉफ्टवेअरद्वारे अमेरिकन नागरिकांना व्हॉईस मेसेज पाठवत होते. नंतर आलेला कॉल स्काइपद्वारे घेऊन अमेरिकन कंपनीतर्फे बोलत असल्याचे भासवत असत. त्यानंतर कर्जाचे प्रलोभन दाखवून कर्जाच्या रकमेनुसार प्रोसेसिंग शुल्क स्वीकारण्यासाठी अमेरिकेतीलच एखाद्या क्‍लब अथवा तत्सम आस्थापनेतून बोलत असल्याचे सांगून रक्कम वळती करावयास सांगत असत. आतापर्यंत या दोघांकडून 600 अमेरिकन नागरिकांची यादी हस्तगत केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com