व्यंग्यचित्रांचा इतिहास पुस्तकांतून जतन करा: सुहास बहुलकर 

Thane
Thane

ठाणे - धीरगंभीर पणा म्हणजे सज्जनता असा समज समाजात असून यामुळे जिवनातील गमती जमतींकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. सज्जनपणा ही केवळ एक वृत्ती आहे. दुसऱयाचे नुकसान न करणे ही एक चांगली वृत्ती आहे, तसेच जाणूनबुजून नुकसान करणे ही एक वाईट प्रवृत्ती आहे. या सगळ्यांना समजून घेत त्यावर भाष्य करतो तो खरा व्यंग्यचित्रकार. व्यंग्यचित्रकार हा आपल्या कलेच्या माध्यमातून समाजातील वाईट गोष्टी, त्यातील व्यंग दूर करण्यासाठी नेहमी मदत करत असतो. व्यंग्यचित्रकलेचा वारसा जपण्यासाठी व्यंग्यचित्रकारांनी काढलेल्या दुर्मिळ चित्रांचा इतिहास पुस्तक रुपात जतन करा, असे मत ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांनी अखिल भारतीय मराठी व्यंग्यचित्र संमेलनात ठाणे येथे व्यक्त केले.

कार्टुनिस्ट कंबाईन संस्थेच्या वतीने ठाण्यात अखिल भारतीय मराठी व्यंग्यचित्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचपाखाडी येथील ज्ञानराज सभागृहात भरविण्यात आलेल्या या संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी चित्रकार बहुलकर यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, संमेलन अध्यक्ष विवेक मेहेत्रे, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, चिंटु कार चारुहास पंडीत, पितांबरीचे विश्वास दामले व परिवहन समिती सदस्य राजेश मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. 

भारतातील विविध कलांचे पुरावे पुरातन काळातही मिळाले आहेत, परंतू व्यंग्यचित्रकलेविषयी कोणताही पुरावा पुरातन काळात नाही. मध्ययुगात या कलेविषयी थोडेफार पुरावे मिळाले आहेत. इंग्रजांच्या राजवटीमध्ये कर्जनचे व्यंग्यचित्र आढळतात. कर्जनचे क्रुरकर्मच सर्वांच्या आठवणीत राहीले असले तरी त्याने पुरातन वस्तू जतन करण्यासाठी कायदा केला. भारतातील कला ही मागासलेली आहे असे इंग्रज बोलायचे परंतू तसेच नव्हते. कर्जनच्या फतव्यानंतर भारतीय कलेकडेही गांर्भियाने पाहीले गेले. राज्यात शंकरराव किर्लेस्करांनी व्यंग्यचित्र कलेला उर्जितावस्था दिली. दलालांचे राजकीय टिकाचित्र हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करण्यासाठी कार्टुनिस्ट कंबाईन संस्थेने प्रयत्न करावेत असा सल्लाही बाहुलकर यांनी यावेळी दिला. 

व्यंगचित्र कार्यक्रमात पाहुण्यांना व्यंग्यचित्र भेट दिल्यास त्यांच्याही ते कायम स्मरणात राहील आणि आपली कलेचा प्रसार होत जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

जयंत सावरकर यावेळी म्हणाले, पूर्वी राजदरबारात विदुषक हे समाजातील दोष दाखविण्याचे काम करीत असत, त्यांना त्यासाठी कोणी शिक्षा करीत नसे. हेच काम आज व्यंग्यचित्रकार करीत आहेत. वर्तमान पत्र, दिवाळी अंक यात प्रसिद्ध होणारे व्यंग्यचित्र आवडीने पाहीले जातात, परंतू त्यामागचा कलाकार नागरिकांना माहित नसतो. तो पहाण्याची कायम उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात असते. यांसारख्या प्रदर्शनातून नक्कीच व्यंग्यचित्रकारांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या कलेलाही प्रोत्साहन समाजमाध्यमातून मिळू शकते. अभिनय क्षेत्रात काम करताना कार्टुनशी आलेला संबंध त्यांनी यावेळी उलगडून दाखविला. 

व्यंग्यचित्रकारही साहित्यिक 
व्यंग्यचित्रकारही साहित्यिक असून समाजाताली व्यंग्य आपल्या चित्रांच्या माध्यमातून ते दुर करीत असतात. परंतू व्यंग्यचित्रकारांना साहित्यिकाचा दर्जा द्यावा असे शंभर वर्षानंतरही कोणाला वाटत नाही असे मत संमेलन अध्यक्ष विवेक मेहेत्रे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले. राज्यातील विद्यापीठांमध्ये व्यंग्यचित्रकलेचा स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम असावा यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्यपालांकडेही चर्चा करण्यात आली आहे, मात्र अद्याप याविषयी कोणतेही उत्तर मिळालेले नाही. याविषयी संस्था पुन्हा एकदा आवाज उठविणार आहे. वृत्तपत्र राजकीय व्यंग्यचित्रांची मागणी मोठ्या प्रमाणात करतात. समाजात सुरु असलेल्या घडामोडींवर व्यंग्यचित्रकार जनतेच्या भावना मांडतो तेव्हा जनताही सुखावते. मात्र माध्यमांच्या रेट्यामुळे व्यंग्यचित्रकाराची कलाच लुप्त होत चालल्याची भिती वाटते. व्यंग्यचित्रकारांचा आवाज झुंडशाही पद्धतीने बंद करण्य़ाचा प्रयत्न केला जात असला तरी समाज माध्यमाचा वापर करीत तुम्ही जनतेचा आवाज व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून मांडा. तेथे तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणीही करु शकणार नाही. केवळ मराठी भाषेपुरती ही कला मर्यादीत न रहाता जगभरात ती प्रचलित व्हावी यासाठी इंग्रजी भाषेवरही प्रभूत्व मिळवा असेही मेहेत्रे यांनी येथे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com