ठाण्यात अचूक हवामान अंदाज

ठाण्यात अचूक हवामान अंदाज

ठाणे - ठाणे शहरातील विविध ठिकाणचा हवामानाचा अचुक अंदाज वर्तवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने शहरात सहा ठिकाणी हवामान यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यांत ही यंत्रणा शहरात कार्यान्वित होईल. यामुळे घोडबंदर, वागळे इस्टेटसोबतच दुर्लक्षित असलेल्या येऊरचे जंगल तसेच मुंब्रा, दिवा या भागातील हवामान समजण्यासही यामुळे मदत होणार आहे. या यंत्रणांचे नियंत्रण हे पालिकेच्या मुख्यालयातून होणार असून नागरिकांना ॲपवर याचे अपडेट्‌स मिनटामिनिटाला मिळणार आहेत. मुख्यतः आपत्ती व्यवस्थापन विभागाला याची मदत होऊन पावसाळ्यातील दुर्घटनांना आळा बसेल, असा विश्‍वास पालिकेने वर्तवला आहे.

ठाणे शहरात वर्तकनगर, माजीवाडा-मानपाडा, वागळे इस्टेट, नौपाडा, रायलादेवी-कळवा, मुंब्रा-दिवा या भागात येत्या काही महिन्यांत हवामान यंत्रणा बसवली जाणार आहे. यासाठी कंत्राटदारांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. सध्या पाचपाखाडी येथे एक यंत्रणा विभागाने बसवली आहे; परंतु या यंत्रणेमुळे सर्व ठिकाणचे हवामान समजण्यात अनेक अडथळे येत आहेत. येऊरच्या जंगलात पडणारा पाऊस, कळवा, दिवा परिसरात पडणारा पाऊस याची नोंद घेता येत नाही. पावसाळ्यातच कोणत्या परिसरात किती पाऊस पडला, याचा अंदाज येत नसल्याने अनेक ठिकाणी नाले तुंबणे, वाहतूक कोंडी, रस्त्यावर पाणी साचणे अशा घटना घडतात. वाऱ्याच्या वेगामुळे झाडांची पडझड मोठ्या प्रमाणात होते. याचा अंदाज आल्यास शहरातील नागरिकांना आवश्‍यक त्या सूचना करून सर्तकतेचा इशारा देता येईल, यासाठी विभागाने विविध भागांत ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हे यंत्र बसवल्यानंतर त्यावरून विविध भागांतील पावसाचे प्रमाण, वाऱ्याची दिशा, उष्णतेची तीव्रता, हवेतील आर्द्रता, तापमान आदींची नोंद घेतली जाणार आहे. 

शहरात सर्वच ठिकाणी एकसारखे हवामान आढळून येत नाही. सध्या केवळ शहराच्या मध्यवर्ती भागातील हवामानाचा अंदाज बांधता येत आहे; परंतु ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर शहरातील विविध विभागांतील हवामानाचा अंदाज समजण्यास मदत होणार आहे. यामुळे आपत्ती काळात होणाऱ्या दुर्घटना काही प्रमाणात टाळता येतील. तसेच नागरिकांनाही हवामानाची माहिती त्यांच्या मोबाईलवर मिळेल. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रदूषण नियंत्रण विभागाचा मानस आहे.

- मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण विभागप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com