भुयारी रेल्वेच्या बेस्ट मॉडेलला वाळवी 

भुयारी रेल्वेच्या बेस्ट मॉडेलला वाळवी 

मुंबई - मुंबईतील प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे 1924 मध्ये भुयारी रेल्वेचा विचार बेस्ट उपक्रमाने केला होता. शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून कट एण्ड कव्हर पद्धतीचा वापर करत भुयारी प्रकल्प उभारता येईल, असा प्रस्ताव बेस्ट उपक्रमाने सरकारकडे मांडला होता; मात्र आर्थिक चणचणीमुळे अनेकदा भुयारी रेल्वेचा प्रस्ताव मागे पडला. आजही बेस्टच्या म्युझियममध्ये या प्रकल्पाचे मिनिएचर मॉडेल पाहायला मिळते. 1960 मध्ये बेस्टच्या अभियंत्याने तयार केलेले भुयारी रेल्वेचे मिनिएचर लाकडी मॉडेल जीर्ण झाले आहे. कट एण्ड कव्हर पद्धतीचे मॉडेल मांडणाऱ्या या कलाकृतीला आता वाळवी लागली आहे. त्यामुळे ऐतिहासिक व महत्त्वाचा तंत्रज्ञानाचा ठेवा जपण्याची गरज आहे. 

बॉम्बे सेंट्रल ते केनेडी ब्रिज अशी रिंग रूटच्या रेल्वेची संकल्पना 1924 मध्ये मांडली होती; पण काही कारणाने ही संकल्पना मागे पडली. पुन्हा 1954 मध्ये ही संकल्पना सरकारपुढे आली; पण सरकारला भुयारी रेल्वेचा प्रकल्प न झेपणारा खर्च पाहता ही योजना व्यवहार्य वाटली नाही. शहरात वाहतुकीच्या साधनांची मर्यादा पाहता सातत्याने भुयारी रेल्वेबाबत रेल्वे, बेस्ट आणि सरकार यांच्यात विचार सुरू होता. त्यानंतर 1956 मध्ये बेस्ट उपक्रमाचे मुख्य अभियंता टी. एस. राव यांनी जपानला जाऊन भुयारी रेल्वेबाबतचा अहवाल बेस्ट उपक्रमाला सादर केला. या वेळी बेस्ट कमिटीचे सदस्य, पश्‍चिम आणि मध्य रेल्वेचे प्रतिनिधी आणि महापालिकेचे विशेष अभियंता या अहवालाबाबतचा विचार सुरू केला. 

भुयारी रेल्वेचा प्रयत्न अनेकदा फसला 
मुंबईच्या भूगर्भाची पाहणीचा विचार करण्यात आला. त्याचप्रमाणे हे काम हिगाशी एण्ड त्सुजी या जपानी तज्ज्ञ कंपनीला दिले. या कंपनीचा अहवाल आल्यानंतर महम्मद अली रोड, डॉ. आंबेडकर रोड या मार्गाने प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम ते दादर अशी भुयारी रेल्वे बांधण्याचा प्रकल्प बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी तयार केला. योजनेच्या प्रारंभिक तयारीकरिता सरकारकडे अर्थसाह्य मागण्यात आले; पण अर्थसाह्याला नकार मिळाल्याने योजनेची वाटचाल फसली. पुढे 1962 मध्ये बर्लिन आणि मिलान येथील रेल्वेचा अभ्यासासाठी आणि त्यासाठीच प्रशिक्षण घेण्यासाठी बेस्ट उपक्रमाचे इंजिनिअर इन चार्ज पी. जी. पाटणकर यांना पाठवले. पाटणकर यांनी पाच टप्प्यात ही योजना मांडण्याचा अहवाल दिला होता. 1964 मध्ये जपानच्या भुयारी प्रकल्पाच्या पाहणीसाठी जपान कन्सल्टिंग इन्स्टिट्यूटने बेस्ट उपक्रमांच्या प्रतिनिधींना बोलावले होते. बेस्टचे प्रतिनिधी जपानहून आल्यानंतर त्यांनी हा अहवाल सादर केला. पाचव्या पंचवार्षिक योजनेत भुयारी रेल्वेचा समावेश व्हावा म्हणून केंद्रात या प्रकल्पासाठी त्या वेळी प्रयत्न करण्यात आले. 

कट एण्ड कव्हर पद्धतीचा 
स्टीलच्या पाईल्सचा वापर करत भुयाराच्या कामासाठी आधार दिला जात असे. लाकडी साहित्याचा वापर करत भुयारातील खोदकाम करणे त्यामुळे शक्‍य होत होते. आठ टप्प्यामध्ये ही कट एण्ड कव्हर पद्धत बेस्टचे अभियंता पी. जी. पाटणकर यांनी मांडली होती. त्याच मिनिएचर मॉडेल बेस्टच्या आणिक आगारातील म्युझियममध्ये आजही पाहायला मिळते. 

भुयारी रेल्वेच स्टेशन 
म्युझियम, सचिवालय, चर्चगेट, फ्लोरा फाऊंटन, विक्‍टोरिया टर्मिनस, क्रॉफर्ड मार्केट, पायधुनी स्टेशन, जे. जे. हॉस्पिटल, क्‍लेर रोड, बॉम्बे सेंट्रल, बलॅड इस्टेट, धोबी तलाव, ठाकूरद्वार, ऑपेरा हाऊस, ग्रॅंट रोड यांसारख्या प्रत्येक स्टेशनचा नकाशा या प्रकल्पासाठी विकसित केला होता. त्यामध्ये पर्जन्य वाहिन्या, मलनिःसारण वाहिन्या, केबल, गॅस, जलवाहिन्या आदींचाही सविस्तर अभ्यास केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com