2500 किलोमीटर सायकलिंगद्वारे "व्हॅलेंटाइन डे' सेलिब्रेशन

cycling
cycling

पुणे - पुण्यातील क्रीडाप्रेमी दांपत्य मधुरा आणि मिलिंद शालगर यांनी श्रीनगर ते पुणे असा 2500 किलोमीटरचा सायकल प्रवास करत लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा केला. या दोघांनी 25 दिवसांत हा प्रवास पूर्ण करून परस्परांना "व्हॅलेंटाइन डे'ची अनोखी भेट दिली. 

सहजीवनाचा रौप्यमहोत्सव साजरा करताना काहीतरी वेगळे करण्याचा विचार शालगर दांपत्याच्या मनात दीड वर्षापूर्वी आला. तेव्हापासून त्यांनी तयारी सुरू केली. यापूर्वी पुणे-सातारा, पुणे-गोवा, मनाली-लेह असे सायकल ट्रेक त्यांनी केले होते व त्या अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी होतीच. कुटुंबीय आणि स्नेहींनीही त्यांना प्रोत्साहन दिले. प्रवासाच्या तयारीबद्दल मिलिंद म्हणाले, ""या प्रवासासाठी उत्तम सायकली होत्याच; पण एक राखीव सायकल सोबत ठेवली. संपूर्ण प्रवासात आमची मोटार सोबत होती. त्यात राखीव सायकल, टायर, ट्यूब, पाणी, खाद्यपदार्थ, कपडे, प्रथमोपचार, संपर्क यंत्रणा होती. सरावासाठी काही सायकल ट्रेक वर्षभर केले. 

नकाशावरून आधी प्रवासाचा मार्ग ठरवला. श्रीनगरपासून पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून प्रवास केला. राहण्यासाठी आयत्या वेळी वाटेवरच सुरक्षित जागा शोधल्या. रोज सकाळी साडेसातपासून सायकलिंगची सुरवात केली. बनिहाल ते जम्मू हा 147 किलोमीटरचा सर्वांत मोठा टप्पा होता.'' 

प्रवासाचा अनुभव सांगताना मधुरा म्हणाल्या, ""श्रीनगरमध्ये उणे तापमानात आम्ही गारठून गेलो होतो, तर राजस्थानात 45 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात अक्षरशः होरपळलो. उत्तर भारतात दाट धुक्‍याचा अनेकदा त्रास झाला. जम्मू-काश्‍मीरमधून प्रवास करताना दडपण, भीती जाणवली; पण सुरक्षा दलांमुळे दिलासाही वाटत राहिला. जम्मू-पठाणकोट हा टप्पा संपूर्ण पावसात पार करावा लागला. प्रवासात एकदाच गिअर तुटला. बाकी काही अडचण आली नाही.'' 

दरवर्षी आम्ही व्हॅलेंटाइन डे एकमेकांसोबत साजरा करतो. यंदा लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे हे वर्ष आणि हा दिवस आमच्यासाठी विशेष होता. तो साजरा करण्यासाठीही काहीतरी वेगळेपण हवे होते. 2500 किमी सायकल प्रवास 25 दिवसांत करण्याचे सुचल्यावर आनंद झाला आणि आज तो पूर्णही झाला, हे समाधान विलक्षण आहे. 
- मिलिंद शालगर 

गेले दीड वर्ष आम्ही झपाटल्यासारखे या प्रवासाच्या नियोजनात होतो. आज हा प्रवास यशस्वी झाला तरी मी अजून हायवेवरून सायकलिंग करते आहे, असेच वाटते आहे. हा प्रवास आमचे नाते अधिक घट्ट करणारा ठरला. खूप शिकवणारा होता, एवढेच मी म्हणेन. अशाप्रकारचे सायकलिंग "मेडिटेशन'प्रमाणे असते, हे आवर्जून सांगावेसे वाटते. 
- मधुरा शालगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com