तुर्भ्यात डम्पिंगविरोधात मोर्चा 

turbhe
turbhe

तुर्भे - नवी मुंबई महापालिकेच्या येथील डम्पिंग ग्राऊंडच्या विरोधात नागरिकांनी काल (ता. 18) मोर्चा काढला. महापौर सुधाकर सोनवणे यांनी आठ दिवसांत डम्पिंग हलवले जाईल, असे आश्‍वासन त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. महापौरांनी हे आश्‍वासन पाळले नाही, तर ठाणे-बेलापूर रस्त्यावर "चक्का जाम' करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. 

तुर्भ्यातील डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ते हटवण्याची मागणी करून त्यासाठी अनेकदा आंदोलने केली; परंतु महापालिकेने दर वेळी केवळ आश्‍वासनेच दिली. यामुळे चिडलेल्या नागरिकांनी शुक्रवारी निदर्शने करून मोर्चा काढला. त्यात येथील पाच प्रभागांतील नागरिक सहभागी झाले होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आजूबाजूच्या कारखान्यांतील कामगारही या आंदोलनात सहभागी झाले होते. तीन वर्षांपासून नागरिक "डम्पिंग हटाव'ची मागणी करत आहेत; परंतु प्रत्येक वेळी महापालिका केवळ आश्‍वासन देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. डम्पिंगच्या विरोधात काढलेल्या मोर्चात नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर महापौरांनी डम्पिंग हटवण्याचे आश्‍वासन दिले; परंतु आठ दिवसांत ते न हटवल्यास ठाणे-बेलापूर रोडवर "चक्का जाम' करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्या वेळी मात्र कोणाचेही ऐकून घेणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. उपमहापौर अविनाश लाड, सभागृहनेते जे. डी. सुतार, नगरसेवक अनंत सुतार हेही या वेळी उपस्थित होते. 

2004 पासून तुर्भे डम्पिंग ग्राऊंड सुरू आहे. त्याच्या दुर्गंधीमुळे तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, हनुमान नगर, पावणे गाव, कातकरी पाडा, शिवशक्ती नगर, बोनसरी, आंबेडकर नगर, गणपती पाडा, गणेशनगर आदी परिसरातील नागरिक, महापालिका शाळा आणि कंपन्यांमधील कामगारांना त्रास होत आहे. येथे दररोज 700 टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. 
डम्पिंगच्या प्रश्‍नावर महापालिकेशी अनेकदा पत्रव्यवहार केला. महासभेत हा मुद्दा उपस्थित केला; परंतु प्रत्येक वेळी केवळ आश्‍वासनापलीकडे पदरात काहीच पडले नाही. याविषयी मी नागरिकांसोबतच आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर रस्त्यावरही उतरू. 
-सुरेश कुलकर्णी, नगरसेवक 

नागरिकांची घुसमट थांबणार 
डम्पिंगच्या प्रश्‍नावर महापौर सुधाकर सोनवणे आणि नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी शुक्रवारी महसूल व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली. त्या वेळी डम्पिंग हलवण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे होणारी तुर्भ्यातील नागरिकांची घुसमट थांबण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com