सीईआरटीसाठी कोटीची गुंतवणूक

सीईआरटीसाठी कोटीची गुंतवणूक

कॉम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्सिव्ह टीम (सीईआरटी) या राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे एक कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सायबर हल्ला झाल्यास सरकारी आस्थापना, तसेच खासगी कार्यालयांना सीईआरटी मदत करेल. राज्यनिहाय सीईआरटी उभारण्यासाठी महाराष्ट्राने अग्रेसर भूमिका घेतली आहे, अशी माहिती राज्याचे सायबर सुरक्षा विभागाचे प्रमुख ब्रिजेश सिंह यांनी सोमवारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेत दिली. सीईआरटी प्रकल्पासाठी जागतिक निविदा काढण्याची तयारीही आमच्या विभागाने केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

सीईआरटी अंतर्गत बिग डेटा सेंटर, कंट्रोल प्रोसेसिंग सेंटर, क्षमता विकास, प्रशिक्षण आणि जागरूकता यासाठी पाच वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे. एखादी कंपनी किंवा संस्थेच्या इंटरनेट सिस्टिमवर सायबर  हल्ला झाल्यास पर्यायी उपाययोजना करण्याचे काम सीईआरटी करेल. गरज  पडल्यास समांतर पद्धतीने सर्व यंत्रणा उभारून देण्यासाठी मदत ही यंत्रणा करेल. विजेचे ग्रीड, पारेषण, जल व्यवस्थापन असे विभागनिहाय या प्रकल्पाअंतर्गत मुख्यत्वे मदत करण्यात येईल. बिग डेटा प्रोजेक्‍टसाठीही या प्रकल्पाअंतर्गत मदत होईल, असे सिंह म्हणाले.

सहा महिन्यांत जागतिक निविदा काढून या प्रकल्पाची सुरुवात करणार आहोत. या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या कंपन्यांना बाजारभावानुसार मोबदला दिला जाईल. राष्ट्रीय पातळीवर सीईआरटी दहा वर्षांहून अधिक काळापासून काम करत आहे; पण केंद्राने राज्यनिहाय सीईआरटी स्थापन करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी दिले होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सीईआरटीचा प्रयोग होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

सायबर लॅबची उभारणी होणार
सीईआरटी प्रकल्पाअंतर्गत सायबर लॅबची उभारणी करण्याचे उद्दिष्ट्य आहे. सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे ही लॅब हाताळेल. स्थानिक पोलिस ठाण्याशी समन्वय साधताना सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणात मदत करण्यासाठी या लॅबची टीम मदत करेल. मुख्यत्वे सायबर हल्ले, डेटा हॅकिंगच्या प्रकरणात या टीमची मदत होईल.   

टीम मॉडेलची केंद्राकडून प्रशंसा
महाराष्ट्रातील सायबर टीमच्या मॉडेलची केंद्र सरकारकडून प्रशंसा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सायबर टीमच्या मॉडेलचे अनुकरण इतर राज्यांनी करावे, असेही केंद्राने सुचवले आहे. त्यामुळे या मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी अनेक राज्यांनी रस दाखवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com