महापौरपदाचे उमेदवार रंगले विद्यार्थ्यांमध्ये! 

महापौरपदाचे उमेदवार रंगले विद्यार्थ्यांमध्ये! 

मुंबई - पेशाने शिक्षक असलेले मुंबईच्या महापौरपदाचे उमेदवार विश्‍वनाथ महाडेश्‍वर रविवारी (ता. 5) पुन्हा एकदा आपल्या जुन्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गराड्यात रमले. विद्यार्थी आणि माजी शिक्षकांसह त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. खोडकर विद्यार्थ्यांना दिलेला चोप, मुलांबरोबर रंगलेला क्रिकेटचा सामना आदी गमतीजमती त्यांनी शेअर केल्या. त्याचबरोबर शाळेत त्या काळी फेमस असलेल्या त्यांच्या अनिल कपूर हेअर स्टाईलचीही प्रामुख्याने आठवण झाली... 

विश्‍वनाथ महाडेश्‍वर घाटकोपर पंतनगरमधील शिवाजी शिक्षण संस्थेच्या मल्टीपर्पज टेक्‍निकल हायस्कूलमध्ये इंग्रजी विषय शिकवायचे. 1986 पासून 2002 पर्यंत त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवले. आपल्या शाळेला त्यांनी रविवारी भेट दिली. त्यांच्याबरोबर शाळेतील शिक्षक आणि माजी विद्यार्थीही उपस्थित होते. शाळेचे संस्थाचालकही उपस्थित होते. भेटीत अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. महाडेश्‍वरसर वर्गात आल्यावर इंग्रजीच्या व्याकरणापासून सुरुवात व्हायची. व्याकरण चुकले, तर फटके ठरलेलेच. वर्गात गमतीजमती असायच्याच; पण अभ्यास करून घेण्यात ते चांगलेच कडक असायचे. असे हे कडक सर मैदानात उतरल्यावर मात्र विद्यार्थीच होऊन जायचे. विद्यार्थ्यांबरोबर क्रिकेट खेळण्यात रमल्यावर वेळ कसा निघून जायचा, हे त्यांना आणि विद्यार्थ्यांनाही समजत नसे... अशा सर्व आठवणींना आज उजाळा मिळाला. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आजही बरोबर ओळखले. बराच वेळ आठवणींची देवाणघेवाण सुरू होती. इंग्रजी आलेच पाहिजे आणि त्यासाठी व्याकरण पक्के हवेच, असा त्यांचा आजही आग्रह आहेच. एक-दीड तास विद्यार्थ्यांच्या गराड्यात महाडेश्‍वरसर रमले होते. या वेळी संस्थेचे चिटणीस शरद फाटक, माजी शिक्षक राजीव भावसार, हरेश जाधव, सनदेमॅडम, नगरसेविका पूजा महाडेश्‍वर आदी उपस्थित होते. 

पत्रकार गेले अन्‌... 
शिक्षक असताना विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांची हेअरस्टाईल अभिनेता अनिल कपूरशी मिळतीजुळती होती. केसांतून हात फिरवण्याची त्यांची लकब तर सर्वच विद्यार्थ्यांच्या आजही लक्षात आहे. आजही त्याची आठवण आलीच. सर पुन्हा तसा केसांमधून हात फिरवून दाखवा, असा हट्ट आजही विद्यार्थ्यांनी धरलाच. त्यावर त्यांच्या नेहमीच्या शैलीत त्यांनी विषय टाळला; पण पत्रकार वर्गातून निघून गेल्यावर त्यांनी केसांमधून हात फिरवून दाखवलाच... 

शिक्षण मातृभाषेतच हवे 
भाषा म्हणून इंग्रजी आले पाहिजेच; पण मुलांचे शिक्षण हे मातृभाषेतच झाले पाहिजे. इंग्रजीत घोकंपट्टी होते, असे ठाम मत विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com