जलद मार्गावर मेगा हाल...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

ठाणे - रेल्वे रुळांच्या आणि रेल्वे यंत्रणेच्या पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कारणांसाठी कल्याण ते ठाणेदरम्यान अप जलद मार्गावर रविवारी (ता. १४) सुमारे पाच तासांचा दीर्घ मेगाब्लॉक घेण्यात आला. मुंबईच्या दिशेने या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका सहन करावा लागला. कल्याणकडून एकही जलद गाडी या काळात सुटली नसल्याने प्रवाशांना धीम्या गाडीतून प्रवास करावा लागला. या गाड्या आधीच भरून येत असल्याने प्रवाशांना ठाणे स्थानकात चढताना मोठी दमछाक करावी लागत होती. उन्हाच्या झळा काहीशा कमी झाल्या असल्या, तरी गर्दीमुळे अनेकांची घुसमट सुरू होती.

ठाणे - रेल्वे रुळांच्या आणि रेल्वे यंत्रणेच्या पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कारणांसाठी कल्याण ते ठाणेदरम्यान अप जलद मार्गावर रविवारी (ता. १४) सुमारे पाच तासांचा दीर्घ मेगाब्लॉक घेण्यात आला. मुंबईच्या दिशेने या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका सहन करावा लागला. कल्याणकडून एकही जलद गाडी या काळात सुटली नसल्याने प्रवाशांना धीम्या गाडीतून प्रवास करावा लागला. या गाड्या आधीच भरून येत असल्याने प्रवाशांना ठाणे स्थानकात चढताना मोठी दमछाक करावी लागत होती. उन्हाच्या झळा काहीशा कमी झाल्या असल्या, तरी गर्दीमुळे अनेकांची घुसमट सुरू होती. लोकलमध्ये चढताना हाणामारीचे प्रकारही घडले.

ठाण्याच्या पलीकडच्या स्थानकांत पावसाळ्यात अनेक तांत्रिक बिघाडाच्या घटना घडत असून त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित होते. पावसाळ्याच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने देखभाल-दुरूस्तीचे काम हाती घेतले असून रविवारी सलग मेगा ब्लॉक घेण्यात आला. काही आठवड्यांपासून हे रविवारचे मेगाब्लॉक ठरलेले आहेत. आजही मुंबईकडे जाणारा जलद मार्ग बंद असल्यामुळे दुपारच्या वेळेत मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांना धीम्या मार्गावरून प्रवास करावा लागला. त्यामुळे गाड्यांमध्ये गर्दी उसळली होती. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही या धीम्या मार्गावरून पुढे काढण्यात येत असल्यामुळे गाड्यांचे शेड्युल खूपच बिघडून गेले होते. सुमारे २० मिनिटांची दिरंगाई रेल्वेकडून अपेक्षित धरण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात अर्धा ते एक तासाचा विलंब गाड्यांना होत होता. दुपारनंतर गाड्यांमधील गर्दी काहीशी कमी झाली होती.

रत्नागिरी पॅसेंजर दिव्यामधून...

दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनची दिरंगाई मेगाब्लॉकच्या दिवशी ठरलेली असून तिला दिवा स्थानकातच वळवण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या गाडीची दिरंगाई टाळण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन आणि मध्य रेल्वेला कडक निर्देश दिले होते. त्यानंतर ही गाडी दादरपर्यंत चालवली जात होती; मात्र मेगाब्लॉकचे कारण देऊन दर रविवारी ही गाडी दिवा स्थानकातूनच सोडली जाते. त्यामुळे गावाकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांना दादर आणि ठाणे स्थानकांतून लोकल गाड्यांनी दिव्याला पोहचावे लागत होते. त्यामुळे सामानासह प्रवास करणाऱ्या या प्रवाशांच्या सामानाची गर्दी लोकलमध्ये वाढली होती.