'मेट्रो 3' धावणार मोटरमनशिवाय!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

सीबीटीसी तंत्रज्ञानाचा वापर; आठ डब्यांचा फलाट

सीबीटीसी तंत्रज्ञानाचा वापर; आठ डब्यांचा फलाट
मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 प्रकल्पात अत्याधुनिक "कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल' (सीबीटीसी) यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे मेट्रो रेल्वे मोटरमनशिवाय धावणार आहे. तसेच मेट्रो स्थानकांत आठ डब्यांचे फलाट उभारण्यात येणार असून, ते प्रवाशांसाठी सुरक्षित असतील, असे मेट्रो रेल कॉपोर्रेशनचे प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता यांनी सांगितले.

मेट्रो मार्गावरील झाडे तोडण्यासाठी उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे विविध टप्प्यांमध्ये मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे, असे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्‍विनी भिडे यांनी सांगितले.

वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी घेऊन हे काम केले जात आहे. झाडे न तोडता हा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही. कॉर्पोरेशनचे वकील न्यायालयात बाजू मांडतील, असेही त्या म्हणाल्या. या प्रकल्पासाठी एक हजार 74 झाडे तोडण्यात येणार असून 1 हजार 727 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. मंडाले, आरे येथे झाडांचे पुनर्रोपण केले जाईल. जुहू कोळीवाडा येथे मेट्रो ट्री गार्डन उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात गोरेगाव आणि काळबादेवी येथील 34 इमारती पाडल्या जाणार होत्या; मात्र विविध पर्याय आणि अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांतून केवळ 18 इमारती पाडल्या जातील. म्हाडा आणि एसआरएच्या मदतीने तेथील नागरिकांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे. काही नागरिकांना घरभाडे देण्याचा पर्यायही असल्याचे भिडे यांनी सांगितले.

कारशेड आरेतच
मेट्रो 3 चे कारशेड कालिना येथे उभारणे अशक्‍य आहे. सरकारने आरे कॉलनीमध्येच कारशेड उभारण्यास परवानगी दिली आहे. या यार्डवर सोलर एनर्जी पॅनेल लावण्यात येणार आहे.

झाडे तोडावीच लागणार
मेट्रो स्थानक आणि मार्गावरील अनेक झाडे तोडण्याशिवाय पर्याय नाही. काही झाडांचे पुनर्रोपण होणार असून काही तोडण्यात येतील. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच या मार्गालगतच्या परिसरात झाडे लावण्यासाठी नागरिकांना वृक्षांचे वाटप करण्यात येत आहे.

Web Title: metro-3 without motorman