संक्रमण शिबिरांवरून म्हाडाच्या मंडळांत वाद

तेजस वाघमारे
शनिवार, 13 मे 2017

बीडीडी चाळींतील रहिवाशांना घरे देण्यास विरोध

बीडीडी चाळींतील रहिवाशांना घरे देण्यास विरोध
मुंबई - बीडीडी चाळींतील रहिवाशांना पुनर्विकास करताना दक्षिण मुंबईतील संक्रमण शिबिरांत घरे देण्यात येणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतलेल्या या निर्णयाला मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने आक्षेप घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीत एखादी घटना घडल्यास येथील रहिवाशांचे पुनर्वसन कुठे करणार, हा प्रश्‍न मंडळाला पडला आहे. त्यामुळे बीडीडी चाळींसाठी 50 टक्के घरेच घ्यावीत, असे पत्र या मंडळाने मुंबई मंडळाला पाठवले आहे. त्यामुळे दोन्ही मंडळांत चांगलीच जुंपण्याची शक्‍यता आहे.

नायगाव, ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींची पुनर्विकास प्रक्रिया सुरू झाली आहे. वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. चाळींच्या पुनर्विकासासाठी येथील रहिवाशांना दक्षिण मुंबईतील संक्रमण शिबिरांत पाठवण्यात येणार आहे. पुनर्रचना मंडळाची दक्षिण मुंबईतील सुमारे साडेबारा हजार घरे या रहिवाशांना देण्यात येतील. मुंबई मंडळाने पुनर्रचना मंडळाला विश्‍वासात न घेताच ही घरे बीडीडी चाळींतील रहिवाशांना देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हाडातील सूत्रांनी सांगितले. मुंबई मंडळाच्या निर्णयाला पुनर्रचना मंडळाने आक्षेप घेतला आहे. दक्षिण मुंबईत पुनर्रचना मंडळाच्या जुन्या आणि मोडकळीस असलेल्या हजारो इमारती आहेत. आपत्कालीन परिस्थितीत येथील रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठवायचे झाल्यास या परिसरात संक्रमण शिबिर नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून मुंबई मंडळाने बीडीडी चाळींतील रहिवाशांना देण्यात येणाऱ्या साडेबारा हजार घरांपैकी 50 टक्के घरे घ्यावीत, अशी सूचना पुनर्रचना मंडळाने केली आहे.

संक्रमण शिबिराअभावी रहिवाशांचे पुनर्वसन रखडून अनुचित प्रकार घडल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, असे या विभागाने मुंबई मंडळाला कळवले आहे. पुनर्रचना मंडळाच्या या कठोर भूमिकेमुळे दोन्ही मंडळांमध्ये जुंपण्याची शक्‍यता आहे.