मराठी चित्रपटांसाठी लवकरच मिनी थिएटर - मेघराज राजेभोसले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

मुंबई - मराठी चित्रपटांसाठी राज्यभरात लवकरच छोटी चित्रपटगृहे सुरू होणार आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटांचा हा प्रश्‍न काही प्रमाणात सुटेल, अशी आशा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी येथे व्यक्त केली.

जागतिक मराठी अकादमी आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाच्या "शोध मराठी मनाचा' परिषदेत दुपारच्या सत्रात "सरस्वतीच्या प्रांगणात' या परिसंवादात राजेभोसले यांनी मराठी चित्रपटांच्या भविष्यातील वाटचालीबाबत भाष्य केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी आणि कवी डॉ. महेश केळुसकर यांनीही या परिसंवादात मराठी भाषा आणि साहित्याबाबत साहित्य महामंडळ आणि कोमसापची भूमिका स्पष्ट केली. मराठी चित्रपट निर्मितीचा आलेख वाढत असला तरी वितरणाची समस्या अजूनही आहे. अनेक सिंगल स्क्रीन थिएटरपेक्षा मिनी थिएटर उभारण्याचा निर्णय लवकरच राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे उपलब्ध होऊ शकतील, असे भोसले म्हणाले. विदर्भ-मराठवाडा असल्यामुळेच संयुक्त महाराष्ट्र आहे. साहित्य महामंडळाने नेहमीच सर्व प्रवाहांतील साहित्यिक-कवींना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे, असे जोशी यांनी सांगितले. कोकण मराठी साहित्य परिषदेची निर्मिती ही प्रामुख्याने तेथील विविधरंगी आणि वेधक बोलीभाषांतील साहित्यातून झाली आहे, असे केळुस्कर म्हणाले.