मराठी पाट्यांचे 'मनसे'वर बुमरँग !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

मनसेचे कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या मालकीच्या खडकपाडा येथील हॉटलेची पाटी चक्क फक्त इंग्रजीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण’ या म्हणीप्रमाणे मनसेच्या आंदोलनाचे पितळ उघडे पडले आहे. 

कल्याण : शहरांतील दुकानांवर असणाऱ्या इंग्रजी पाट्यांविरोधात कल्याण शहर मनसेने मोठ्या धडाक्यात आंदोलन केले खरे; परंतु मनसे पदाधिकाऱ्यांच्या मालकीच्या हॉटेलवरील पाट्या मात्र चक्क इंग्रजीत असल्याचे समोर आले आहे. 

मनसेचे कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या मालकीच्या खडकपाडा येथील हॉटलेची पाटी चक्क फक्त इंग्रजीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण’ या म्हणीप्रमाणे मनसेच्या आंदोलनाचे पितळ उघडे पडले आहे. 

कल्याणातील पत्रकार कुणाल म्हात्रे यांनी ही बाब प्रसिद्धी माध्यमांसमोर आणली. त्यानंतर सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी कल्याण शहर मनसेच्या या दुटप्पी भूमिकेविरोधात वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे नाईलाजास्तव अखेर मनसेला शहराध्यक्षांच्या मालकीच्या हॉटलेच्या पाटीलाही काळे फासावे लागले. गाढ झोपेतून जागे झालेल्या कल्याण शहर मनसेचे आजचे आंदोलन बुमरँग होऊन त्यांच्यावरच उलटल्याचे बोलले जात आहे.