पाकिस्तानी कलाकारांना मनसेचा विरोध कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 ऑक्टोबर 2016

ऐन दिवाळीच्या धामधुमीत करण जोहरचा "ए दिल है मुश्‍कील‘ प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचा "रईस‘ जानेवारीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार फवाद खान व माहिरा खानने काम केले आहे. दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाला मनसेचा तीव्र विरोध आहे.

मुंबई - इंडियन मोशन्स पिक्‍चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनने (इम्पा) पाकिस्तानी कलाकार काम करीत असलेले चित्रपट विनाअडथळा प्रदर्शित व्हावेत, अशी विनंती शिवसेना आणि मनसेला केली होती. ही विनंती मनसेने धुडकावून लावली आहे. पाकिस्तानी कलाकारांनी काम केलेल्या चित्रपटांना मनसेचा विरोध कायम आहे. 

ऐन दिवाळीच्या धामधुमीत करण जोहरचा "ए दिल है मुश्‍कील‘ प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचा "रईस‘ जानेवारीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार फवाद खान व माहिरा खानने काम केले आहे. दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाला मनसेचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे निर्मात्यांची संघटना "इम्पा‘ने निर्मात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हे चित्रपट प्रदर्शित व्हावेत, अशी विनंती मनसे व शिवसेनेला केली होती.

ही विनंती करण्यासाठी इम्पाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मनसेच्या शालिनी ठाकरे यांची भेट घेतली; त्यांनी ही विनंती फेटाळून लावली. शालिनी ठाकरे म्हणाल्या, की पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांत काम करण्यास परवानगी देऊ नये, अशी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांची मागणी आहे. आधी वाटत होते, त्यापेक्षा हा विषय अधिक व्यापक बनला आहे.