आईने केले बाळाला यकृतदान 

आईने केले बाळाला यकृतदान 

मुंबई - पश्‍चिम भारतात सर्वात कमी वयाच्या बालकावर यकृत प्रत्यारोपणाची पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया मुंबई सेंट्रल येथील वोक्‍हार्ट रुग्णालयात झाल्याचा दावा या रुग्णालयाने केला आहे. पालघर जिल्ह्याच्या घोलवड तालुक्‍यातील काव्य राऊत या अवघ्या नऊ महिन्यांच्या मुलावर त्याच्या आईने दिलेल्या यकृताच्या भागाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. 

१४ जूनला झालेली ही शस्त्रक्रिया १४ तास सुरू होती. गेल्या वर्षी १८ ऑगस्टला जन्मलेल्या काव्यला जन्मापासूनच यकृताचा आजार झाला होता. तो सव्वा महिन्याचा असताना डॉक्‍टरांनी बिलिअरी आर्टेसियाचे निदान केले. यात यकृतापासून आतड्यांपर्यंत पित्त वाहून नेणारी नलिकाच अस्तित्वात नसते. दोन महिन्यांचा असताना काव्यवर मुंबईतील रुग्णालयात झालेली पोर्टो एंटरस्टॉमी ही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली. उलट त्याला लिव्हर सोरायसिस झाला. त्याची वाढ खुंटली. वजन ५.६ किलोवर आले. कावीळही झाली, पोटात पाणी साचले. त्यामुळे त्याला  वोक्‍हार्ट रुग्णालयात नेण्याचा निर्णय पालकांनी घेतला. उपचारासाठी १५ ते १६ लाखांचा निधी रुग्णालयातील समाजसेवकांनी जमा केला. काव्यसाठी आईच्या यकृताचा २६० ग्रॅम भाग घेतला गेला; मात्र तो मोठा ठरत असल्याने २१० ग्रॅमवर आणला गेला.

आव्हान कोणते?
रुग्णालयातील डॉ. अनुराग श्रीमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा किलोपेक्षा कमी वजन असलेल्या मुलांवर प्रत्यारोपण करणे आव्हानात्मक असते. काव्यवर यापूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेमुळे छोटे व मोठे आतडे यकृताशी पूर्णपणे चिकटले होते. आम्ही ते वेगळे केले. कमी रक्तस्राव होईल याकडे लक्ष दिले. कारण ३०० ते ४०० मिलिलिटरपेक्षा जास्त रक्तस्राव हे बाळ सहन करू शकले नसते.

माझ्या मुलाला नवसंजीवनी मिळाली आहे. काव्य लढवय्या आहे. लहान वयातच त्याने शस्त्रक्रिया आणि भूल सहन केली. 
- विवेक राऊत, काव्यचे पिता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com