युतीच्या साठमारीत अन्य पक्षांचे काय? 

Mrunalini nanivadekar writes About 'Yuti'
Mrunalini nanivadekar writes About 'Yuti'

शिवसेना-भाजपची फारकत झाल्यानंतर आता कॉंग्रेस-"राष्ट्रवादी' नव्याने एकत्र येण्याची स्वप्ने बघत आहेत; पण मने सांधली जात नाहीत, तेथे मते कशी सांधली जाणार? अशा परिस्थितीत जो काय लढा असेल तो शिवसेना विरुद्ध भाजप, असा मर्यादित होण्याची चिन्हे आहेत. 
 

नरेंद्र मोदी नावाच्या झंझावाताने भाजपच्या शिडात हवा भरण्यापूर्वी महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन पक्ष सत्तेत वावरत अन्‌ सरकार चालवताना सहकार्य करतानाच निवडणुकांत मात्र परस्परविरोधात उभे राहून विरोधी पक्षाची जागाही आपसात वाटून घेत. शिवसेनेने वेगळे लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने मुंबईतही तसेच होणार आहे. वेगळे झाल्यावर प्रश्‍न निर्माण होतात ते पुढील वाटचालीचे. 
मुंबईच्या बहुभाषक स्वरूपात मराठी टक्‍का जेमतेम 35 ते 40 टक्‍के उरला असावा, असे अभ्यासक मानतात. तो शिवसेनेचा खरा जनाधार. या वेळी मनसेला फार मते मिळणार नाहीत, असे काही काळासाठी गृहीत धरले तरी या मराठी टक्‍क्‍यातील छोटासा का होईना, पण काही भाग भाजपकडे जाऊ शकतो. प्रश्‍न उरतो तो 60 ते 65 टक्‍के अमराठी, मुंबईला "कॉस्मोपॉलिटन' करणाऱ्या लोकसंख्येचा. भाजपची मदार याच मतांवर असल्याने युतीत सरशी कोणाची, या प्रश्‍नाइतकाच महत्त्वाचा झाला आहे तो अन्य अहिंदुत्ववादी पक्ष यात किती जागा खेचतात याचा. भाजप-शिवसेना युती झाली तर मुंबईतील अमराठी मते आपोआप कॉंग्रेसकडे जातात. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा जोडीजोडीच्या लढाईत दोन्ही आघाड्यांच्या मतात केवळ दोन टक्‍क्‍यांचा फरक होता. दोन टक्‍क्‍यांच्या फरकाने युतीला 43 अधिक जागा मिळवून दिल्या होत्या. नोटाबंदीच्या निर्णयामुळे व्यापारीवर्गाचे फार मोठे नुकसान झाले, असे बोलले जाते. या वर्गात भाजपची पारंपरिक मतपेढी असलेल्या गुजराती, मारवाडी समुदायाचा मोठा समावेश आहे. त्यामुळे मराठी मते शिवसेनेची आणि गुजराती मते भाजपची हे समीकरणच बदलून जाऊ शकते. दंगलीच्या काळात शिवसेनेने मदत केली, असे मानणारा हा वर्ग त्यांच्याकडे जाईल काय? शिवाय मुंबईत मोठ्या प्रमाणात आश्रयाला आलेल्या आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असलेल्या उत्तर भारतीयांचे काय? हा वर्ग बहुतांश वेळा झोपडपट्टीधारकांप्रमाणे कॉंग्रेसच्या मागे उभा राहणारा. तिकडे आपल्या राज्यात सप, बसपच्या पाठीशी उभी राहणारी ही मते येथे मुंबईत हमखास कॉंग्रेसच्या पाठीशी उभी राहत. त्यामुळेच कॉंग्रेसने अत्यंत पद्धतशीरपणे कृपाशंकरसिंह यांच्यासारखे भय्या नेतृत्व पुढे आणले. शिवसेनेत असताना संजय निरुपम यांनी हाच मताधार जोडायला "मी मुंबईकर' हे अभियान उद्धव ठाकरे यांना कसे आवश्‍यक आहे, ते समजावून सांगितले होते. शिवसेनेत अंतर्गत धुसफूस झाल्यानंतर निरुपम कॉंग्रेसवासी झाले अन्‌ याच उत्तर प्रदेशी, बिहारी मतांच्या आधाराने मुंबईत स्वत:चे स्थान अबाधित ठेवू शकले. गेली तीन वर्षे ते पद्धतशीरपणे हा जनाधार कॉंग्रेसच्या पाठीशी उभे करण्याचा प्रयत्न करताहेत. पण या वेळी भाजपने अधिकृतपणे शिवसेनेशी फारकत घेतली असल्याने त्यांच्या राजकारणालाही यश मिळण्याची शक्‍यता अत्यंत कमी असावी, असे वाटते. गुरुदास कामत हे मुंबईतले सर्वाधिक महत्त्वाचे कॉंग्रेस नेते. कुठलाही समाज पाठीशी नसताना ते कार्यकर्त्यांचे बळ सांभाळतात. आज ते नाराज आहेत. गेल्या वेळी त्यांची समजूत घालण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जंगजंग पछाडले होते. कॉंग्रेसमधील ही भांडणे बाहेरून आलेला कोण नेता सोडवू शकेल? दलित मते रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखाली भाजपकडे वळतील काय, तेही अद्याप माहीत नाही. त्यातच भर पडणार आहे ती अल्पसंख्याक समुदायात मते कशी विभागली जाणार याची. 
"एमआयएम'ने गेल्या काही दिवसांपासून हैदराबादच्या आपल्या "प्रयोगशाळे'ची विस्तारित शाखा महाराष्ट्रात उघडली आहे. औरंगाबादेत दलित-मुस्लिम ध्रुवीकरणाने त्यांना प्रचंड यश मिळवून दिले आहे. आता मुंबईच्या मिनी भारतभूमीत ते शिरले आहेत ते ध्रुवीकरण करू या ईर्षेने. भाजपचे परिवारबंधू असलेल्या काही संघटनांना मुस्लिम समाजातील प्रचलित दोष दूर करण्याची, शिक्षणाचे प्रमाण वाढवण्याची जबाबदारी आपली आहे हे सत्य मान्य नाही. त्यामुळे ध्रुवीकरणात "घेट्टो' होऊन बसलेल्या या समाजात जहाल वक्‍तव्य करणाऱ्या पक्षांची केव्हाही चलती होऊ शकते. एकेकाळी याच समुदायात समाजवादी पक्षाने पाय रोवले होते. ती जागा आता "एमआयएम' घेऊ बघते आहे. "एमआयएम' ही भाजपची "बी टीम' असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असतेच. महाराष्ट्रातही काही मंत्री "आमच्या मतदारसंघात शिरू नका,' अशी आर्जवे किंवा परिस्थिती अनुकूल करून घ्यायची असेल तर आमंत्रणाच्या सुपाऱ्या आम्हाला पाठवतात, असे "एमआयएम'चे नेतेच सांगत असतात. त्यातच मुस्लिम अल्पसंख्याक समाज हा अत्यंत पद्धतशीरपणे ठरवून सामूहिक मतदान करत असतो. त्यामुळेच या वेळी मुंबईतील अल्पसंख्याक मते "एमआयएम', समाजवादी पक्ष की कॉंग्रेसकडे वळतील याचा अंदाज नाही. ही मते एकगठ्ठा मिळवणारा पक्ष 25 ते 30 नगरसेवक निवडून पाठवेल. ओवैसी बंधू सध्या महाराष्ट्रात आणि मुंबईत डेरेदाखल होण्याचा कार्यक्रम ठरवत आहेत. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही या अन्य पक्षांच्या यादीत आहेच. हा पक्ष कधीही मुंबईत चार लाखांची मजल ओलांडताना दिसत नाही. सचिन अहिर अत्यंत मेहनती, कामगार वर्गात लोकप्रिय असणारे नेते आहेत. त्यांनी या वेळी चांगले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. शिवसेना-भाजपची फारकत झाल्यानंतर आता कॉंग्रेस-"राष्ट्रवादी' नव्याने एकत्र येण्याची स्वप्ने बघत आहेत. मने सांधली जात नाहीत, तेथे मते कशी सांधली जाणार? 
"आप'ने पंजाबकडे लक्ष द्यायचे ठरवले असल्याने ते मुंबईच्या मॅरेथॉनमध्ये उतरलेच नाहीत. अशा परिस्थितीत जो काय लढा असेल तो शिवसेना विरुद्ध भाजप असा मर्यादित होण्याची लक्षणे आहेत. तिसऱ्या आघाडीचे ध्रुवीकरण त्यात कसे असेल, ते किती मते खेचतील हे महत्त्वाचे तरी ठरणार आहे काय? काही नगरसेवक चिरेबंदी बांधणीमुळे कुठेही गेले, तरी कुठल्याही पक्षात असले तरी जिंकून येतात. त्यांची संख्या किमान 40 आहे असे म्हणतात. मात्र आता तेही कुठल्या तरी पक्षाच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे चार-दोन नगरसेवक मुंबईत कधीमधी निवडून येतात, ते या वेळी प्रभावहीन आहेत, अशी स्थिती आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com