केबल जाळ्यात मुंबई गुरफटली!

केबल जाळ्यात मुंबई गुरफटली!


मुंबई - इमारती, मैदाने, रस्ते, झाडे आणि पथदिव्यांच्या खांबांवरून वाटेल तशा टाकण्यात आलेल्या टीव्ही-इंटरनेट केबलचे तब्बल एक लाख किलोमीटर लांबीचे जाळे मुंबईत पसरले आहे. एवढा मोठा गुंता सोडवायचा कसा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. केबलच्या गुंत्यामुळे लहान-मोठे अपघात होत असून त्यावर कोणाचे नियंत्रणच नाही, अशी परिस्थिती आहे. इमारतींवरून केबल टाकण्याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही नियम नसल्याने परिस्थिती कठीण झाली आहे.

घरोघरी टीव्ही केबल व त्यामार्फत इंटरनेट सेवा घेतली जाते. त्यासाठी स्थानिक केबल ऑपरेटरमार्फत प्रत्येक इमारतीत जाड वायरी टाकल्या जातात. गच्चीवर आलेल्या वायरी तेथील मेन युनिटमध्ये जाऊन तेथून घरोघरी पोहोचवल्या जातात. इमारतींच्या आतमध्ये त्या व्यवस्थित कडेकडेने खिळ्याने अडकवून घरापर्यंत नेल्या जातात; परंतु इमारतींमध्ये येईपर्यंत त्यांचा प्रवास अक्षरशः बेकायदा व कोणाच्याही नियंत्रणाशिवाय होतो. परिणामी शहर विद्रूप होतेच; पण अपघाताचा धोकाही असतो.
जमिनीखालून टाकल्या जाणाऱ्या केबल, वायरिंग, जलवाहिन्या वा गॅसवाहिन्यांवर महापालिकेचे कठोर नियंत्रण असते. त्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे, त्यांचे शुल्क देणे, तपासणी आदी सोपस्कार पार पाडावे लागतात. त्याचमुळे भूमिगत वायरिंग साधारणपणे सुरक्षित असते. किंबहुना टॉवरवरून किंवा खांबांवरून जाणाऱ्या वीजवाहिन्यांसाठीही काटेकोर नियम व निर्बंध असतात. हे शुल्क व सारा उपद्‌व्याप वाचविण्यासाठी स्थानिक केबल ऑपरेटर भूमिगत केबल न टाकता हवेतून वाटेल तशा वायरी फिरवतात. काही केबल तर रस्त्यांवरून जेमतेम दहा फूट उंचीवरूनही गेलेल्या असतात. त्यामुळे मोठे अपघातही होऊ शकतात. इतकी वर्षे अशा प्रकारे केबल टाकल्या जात असताना महापालिकेनेही बघ्याचीच भूमिका घेतली. केंद्र सरकारने केबलचालकांवर नियंत्रण ठेवून आपला महसूल वाढविण्यासाठी त्यांची नोंदणी आवश्‍यक केली; परंतु केबलचे जंजाळ होऊ नये म्हणून नियम का केले जात नाहीत, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

तरुणाच्या मृत्यूला जबाबदार कोण?
कशाही प्रकारे टाकण्यात आलेल्या केबल वायरींमुळे काही दिवसांपूर्वी गिरगावात अपघात होऊन एक तरुण मृत्युमुखी पडला. महापालिका कर्मचारी झाडांच्या फांद्या छाटत असताना एक फांदी अशाच एका अनिर्बंधपणे लावण्यात आलेल्या केबलवर पडली. ती केबल तेथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील रेलिंगला बांधण्यात आली होती. फांदीच्या वजनामुळे रेलिंग खाली आले आणि तरुणाच्या अंगावर पडल्याने तो ठार झाला. केबल नसती तर ती फांदी सुरक्षितपणे खाली पडली असती. त्यामुळे आता तरुणाच्या मृत्यूबद्दल कोणाला जबाबदार धरावे, असा प्रश्‍न रहिवासी विचारीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com