मुंबईतील बोगस कंपन्यांचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

भुजबळ प्रकरणात 46.7 कोटींची रक्कम व्यवहारात आणल्याचे उघड

भुजबळ प्रकरणात 46.7 कोटींची रक्कम व्यवहारात आणल्याचे उघड
मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काळ्या पैशाविरोधात देशभरात मोठी मोहीम राबविताना 16 राज्यांतील 100 हून अधिक ठिकाणी शनिवारी छापे टाकले. त्यापैकी मुंबईतही सुमारे 35 ठिकाणांवर छापे टाकून काळा पैसा पांढरा करून देणाऱ्या तब्बल 700 बोगस कंपन्या चालवणाऱ्यांचा पर्दाफाश केला. या कंपन्यांचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व राजेश्‍वर एक्‍सपोर्ट कंपनी या प्रकरणांशीही संबंध असल्याचे पुढे आले असून, या दोन्ही प्रकरणांमध्ये सुमारे 50 कोटी रुपयांच्या काळ्या पैशांचा व्यवहार झाली असल्याची माहिती "ईडी'च्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

ईडीच्या मुंबईतील कारवाईत भुजबळांना अटक झालेले 870 कोटी रुपयांचे महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरण व 1500 कोटींचा काळा पैसा परदेशात पाठवण्यात आलेल्या राजेश्‍वर एक्‍सपोर्ट प्रकरणांचाही समावेश उघड झाला आहे. छापा टाकण्यात आलेल्या बोगस कंपन्यांमार्फत भुजबळ प्रकरणात 46.7 कोटी व राजेश्‍वर एक्‍सपोर्टप्रकरणी दोन कोटींची रक्कम व्यवहारात आणण्यात आली. या कंपन्यांच्या बनावट संचालकांपासून अगदी चार्टर्ड अकाउंटंटही ईडीच्या रडारवर आले आहेत.

सातांक्रूझ येथील जगदीश पुरोहित व्यक्तींचे या प्रकरणी नाव पुढे आले असून, त्याचे धागेदोरे भुजबळ प्रकरणाशी जोडले गेले आहेत. या रॅकेटमार्फत 700 बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या कंपन्यांसाठी 20 तोतया संचालक उभे करण्यात आले असून, त्यांच्यामार्फत भुजबळांची 46.7 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता व्यवहारात आणण्यात आली. याशिवाय या रॅकेटचा परळ येथील राजेश्‍वर एक्‍सपोर्ट कंपनीशीही संबंध उघड झाला असून, राजेश्‍वर एक्‍सपोर्टमार्फत 1500 कोटींची बेहिशेबी रक्कम दुबई व हॉंगकॉंगला पाठवण्यात आली होती. हे प्रकरण हजारो कोटी रुपयांचे आहे. त्यासाठी सुमारे 25 बोगस कंपन्या उघडण्यात आल्या होत्या; पण शनिवारी टाकण्यात आलेल्या छाप्यात या रॅकेटमार्फत राजेश्‍वर एक्‍सपोर्टचे 2 कोटी रुपये व्यवहारात आणण्यात आले. या सर्व प्रकरणामध्ये छोट्या चालकापासून अगदी सीएपर्यंत 40 व्यक्ती पोलिसांच्या रडावर आले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बोगस कंपन्या काळा पैसा व्यवहारात आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. काळ्या पैशाच्या खेळात जे कोणी सामील असतील, त्यांना आम्ही सोडणार नाही.
- कर्नाल सिंग, ईडीचे संचालक

Web Title: Mumbai exposed the bogus companies