'मुंबई फर्स्ट'च्या जाहिरातीची तपासणी करणार - सहारिया

'मुंबई फर्स्ट'च्या जाहिरातीची तपासणी करणार - सहारिया

मुंबई - राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मुंबईतील वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीसंदर्भात अधिक तपासणी करून कारवाईबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी दिली. या जाहिरातीवरून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता आमीर खान आणि "मुंबई फर्स्ट' या स्वयंसेवी संस्थेविरोधात मंगळवारी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली.

शिवसेनेच्या वतीने ऍड. धर्मेंद्र मिश्रा यांनी ही तक्रार दाखल केली असून, ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. तसेच कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी आज सहारिया यांच्याकडे कारवाईची मागणी केली असता सहारिया बोलत होते.

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार संपल्यावर कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा खासगी वृत्तवाहिन्यावर जाहिराती करण्यास राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना मज्जाव केला होता. आयोगाच्या निर्णयानुसार 19 फेब्रुवारीपासूनच प्रसारमाध्यमांवरील प्रचाराच्या जाहिराती बंद झाल्या होत्या. मुंबईतील एका दैनिकात "मुंबई फर्स्ट'च्या माध्यमातून देण्यात आलेल्या जाहिरातींवर कॉंग्रेससह शिवसेनेने आक्षेप घेतला. प्रचाराची वेळ संपल्यानंतर आज वृत्तपत्राला जाहिराती देण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये अभिनेता आमीर खानचा फोटो वापरला आहे. जाहिरातीत "पारदर्शकता' हा शब्द ठळकपणे छापण्यात आला असून, याशिवाय पारदर्शकतेला मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहनही करण्यात आले आहे. त्याचबरोबर "परिवर्तन' या मथळ्याखाली मुंबईतील झोपडपट्ट्या, खड्डे, पाण्याची समस्या आदींची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. त्यावर कॉंग्रेससह शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी आज सहारिया यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली.

'प्रचार संपल्यावर भाजप जाहिरात करत असेल तर ती गंभीर बाब आहे. भाजपची अगतिकता यामागे दिसून येते. "मुंबई फर्स्ट' ही संस्था भाजपशी संबंधित असल्याने जाहिरातीमागे थेट भाजपचा हात आहे. या संस्थेने यापूर्वी अनेकदा मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने संस्थेसह भाजपच्या विरोधात गुन्हा दाखल करावा.''
- सचिन सावंत, प्रवक्‍ता, कॉंग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com