मुंबईच्या निकालात किंचित वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

मुंबई - दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. 8) ऑनलाईन जाहीर झाला. मुंबई विभागाचा निकाल 90.41 टक्के लागला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात 0.32 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे; तर मुंबई विभागात मुंबई पश्‍चिम उपनगर विभागाने बाजी मारली असून या विभागाचा निकाल 92.21 टक्के लागला आहे. 

मुंबई - दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. 8) ऑनलाईन जाहीर झाला. मुंबई विभागाचा निकाल 90.41 टक्के लागला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात 0.32 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे; तर मुंबई विभागात मुंबई पश्‍चिम उपनगर विभागाने बाजी मारली असून या विभागाचा निकाल 92.21 टक्के लागला आहे. 

मुंबई विभागातून यंदा 3 लाख 38 हजार 609 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 3 लाख 6 हजार 151 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा दिलेल्यांमध्ये 1 लाख 77 हजार 656 मुले, तर 1 लाख 60 हजार 953 मुलींचा समावेश आहे. यामधील 1 लाख 57 हजार 735 मुले, तर 1 लाख 48 हजार 416 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 86.45 टक्के मुले, तर 91.35 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींच्या उत्तीर्णत्तेचे प्रमाण अधिक आहे. 

मुंबई विभागामधील मुंबई पश्‍चिम उपनगराचा निकाल 92.21 टक्के लागला आहे. या विभागातून 62 हजार 288 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 57 हजार 436 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी 92.21 आहे. त्याखालोखाल दक्षिण मुंबईचा निकाल 91.34 टक्के लागला आहे. या विभागातील 32 हजार 130 विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 348 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 91.34 आहे. 

विद्यार्थ्यांसाठी अनेक विषय कठीण 
दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयासह गणित, विज्ञान-तंत्रज्ञान, सामान्य गणित आणि तमिळ हे विषय कठीण जात आहेत. मुंबई विभागाचा मराठीचा निकाल 88.89 टक्के लागला आहे; तर तमिळ 79.75, इंग्रजी 88.51, गणित 87.87, विज्ञान-तंत्रज्ञान 91.39, सामान्य गणित 78.27 असा निकाल लागला आहे. एकूण 11 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 

23 हजार विद्यार्थ्यांना एटीकेटी 
मुंबई विभागातून परीक्षेला बसलेल्या सुमारे 22 हजार 924 विद्यार्थ्यांना एटीकेटी लागली आहे. दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मंडळाने एटीकेटी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एटीकेटी सवलतीमुळे अकरावीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्षात शिकत असताना एटीकेटी मिळालेला विषय घेऊन जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेत विद्यार्थी पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास 2019 वा त्यापुढील परीक्षेत प्रविष्ट होता येणार आहे; मात्र अशा विद्यार्थ्यांचा अकरावीचा निकाल दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच जाहीर करण्यात येणार आहे. 

30 हजार विद्यार्थ्यांना कोट्याचा लाभ 
मुंबई विभागातील 29 हजार 648 विद्यार्थ्यांना कला, क्रीडा कोट्यातील वाढीव गुणांची सवलत मिळाली आहे. चित्रकलेत 28 हजार 200 विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळाला आहे; तर शास्त्रीय नृत्य प्रकारात 733 विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळाले आहेत. 387 विद्यार्थ्यांना क्रीडा कोटा, वादन 175, शास्त्रीय गायन 141, लोककला आणि नाटक कोट्याचा लाभ अनुक्रमे 4 आणि 8 विद्यार्थ्यांना मिळाला आहे. 

हेल्पलाईन 
परीक्षा आणि निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास विद्यार्थी आणि पालक मुंबई विभागीय मंडळाच्या 27893756 किंवा 27881075 या क्रमांकावर संपर्क साधू शकतील. ही हेल्पलाईन 6 जूनपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहणार आहे. 

Web Title: Mumbai growth slightly increased in ssc result