माणिक भिडे यांना पं. भीमसेन जोशी जीवनगौरव

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्य सरकारतर्फे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी ही घोषणा केली.

मुंबई - राज्य सरकारतर्फे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी ही घोषणा केली.

शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास या पुरस्काराने गौरवले जाते. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पं. केशव गिंडे, पं. नाथराव नेरळकर, कमलताई भोंडे यांच्या समितीने या पुरस्कारासाठी अत्रोली घराण्यातील (जयपूर) भिडे यांची शिफारस केली होती. यापूर्वी किशोरी आमोणकर, पं. जसराज, प्रभा अत्रे, पं. राम नारायण, परवीन सुलताना यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

1935 मघ्ये कोल्हापूरला जन्मलेल्या भिडे यांना आई-वडिलांकडून अभिजात संगीत शिकण्यास प्रोत्साहन मिळाले. अत्रोली घराण्याचे आद्यपुरुष उस्ताद अल्लादियॉं खॉं यांचे पुत्र उस्ताद मजी खॉं आणि भूर्जी खॉं साहेब यांची तालीम लाभलेले मधुकरराव सडोलीकर हे भिडे यांना गुरू म्हणून लाभले. गोविंद भिडे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या मुंबईत आल्या. या काळात त्यांनी किशोरी अमोणकर यांचे शिष्यत्व पत्करले. आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार असलेल्या भिडे यांच्या गायनाचे देश-विदेशांत अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या गाण्यांच्या सीडीही बाजारात उपलब्ध आहेत.

संगीताची परंपरा जोपासणे, हे कर्तव्य माणून भिडे यांनी अनेक शिष्य घडवले आहेत. त्यात त्यांच्या कन्या अश्‍विनी भिडे-देशपांडे, माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतिका वर्दे यांचा समावेश आहे.