वाशीममधील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

मुंबई - श्री संत सेवालाल महाराज, पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशीम) तसेच श्री मुंगसाजी महाराज समाधिस्थळ, धामणगाव (ता. दारव्हा, जि. यवतमाळ) ही दोन तीर्थक्षेत्रे आणि स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक (सातारा) व स्वातंत्र्य सैनिक कै. पांडू मास्तर ऊर्फ पांडुरंग गोविंद पाटील स्मारक, येडेनिपाणी (ता. वाळवा, जि. सांगली) या दोन स्मारकांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता दिली.

श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकासासाठी 25 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये भक्तनिवास बांधकाम - 2 कोटी 55 लाख 38 हजार रुपये, संरक्षण भिंतीचे बांधकाम - 1 कोटी 2 हजार रुपये, प्रदर्शन केंद्र - 14 कोटी 64 लाख 42 हजार रुपये, अंतर्गत रस्त्याचे बांधकाम - 96 लाख 49 हजार रुपये, सभामंडपाचे बांधकाम - 2 कोटी 40 लाख 2 हजार रुपये, जमिनीचे सपाटीकरण, बगीचा व सौंदर्यीकरण - 3 कोटी 46 लाख 50 हजार रुपये इतक्‍या खर्चाच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यापेक्षा अधिक लागणारा खर्च तीर्थक्षेत्र ट्रस्टने करावा असे ठरले.