मुंबईतील रुग्णांना महापालिकेचा दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मुंबई - "आपली चिकित्सा' या संकल्पनेतून महापालिकेने मुंबईतील रुग्णांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या 150 दवाखान्यांबरोबरच आता सर्व रुग्णालये, विशेष रुग्णालये आणि प्रसूतिगृहांत वैद्यकीय चाचण्या होणार आहेत. खासगी प्रयोगशाळांच्या मदतीने पालिका ही संकल्पना राबवणार असून त्यासाठी पालिकेने ठरवलेले माफक शुल्क आकारले जाणार आहे. हे वैद्यकीय अहवाल डॉक्‍टरांना मोबाईल आणि ईमेलवर तत्काळ उपलब्ध होणार असल्याने रुग्णांवर लगेच उपचार करणे शक्‍य होईल. 

पालिकेचे केईम, नायर आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय वगळता अन्यत्र वैद्यकीय चाचण्या (पॅथॉलॉजिकल टेस्ट) होत नसल्याने खासगी प्रयोगशाळांत रुग्णांना या चाचण्या कराव्या लागतात. त्यासाठी पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. अनेकदा या चाचण्यांची सोय नसल्याने रुग्ण या मुख्य रुग्णालयांत येतात. त्यामुळे तेथील कामाचा ताण वाढतो. यावर उपाय म्हणून दवाखान्यांसह पालिकेच्या सर्व रुग्णालयांत प्राथमिक स्वरूपाच्या तब्बल 77 आणि 63 गुंतागुंतीच्या अशा 140 चाचण्या करण्याची सोय केली जाणार आहे. यासाठी खासगी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. 

या चाचण्यांचे शुल्क पालिकेच्या रुग्णालयातील दरांप्रमाणेच असल्याने रुग्णांना माफक दरात या सुविधा मिळतील. यासाठी अर्थसंकल्पात 16 कोटी 15 लाखांची तरतूद आहे. तातडीच्या चाचण्यांचे अहवाल तीन तासांत आणि इतर अहवाल आठ ते 10 तासांत रुग्णांना मिळतील. हे अहवाल डॉक्‍टरांना ईमेल अथवा मोबाईलवर पाहता येतील. 

पावसाळ्यांतील आजार 
या चाचण्या प्रामुख्याने पावसाळ्यात होणाऱ्या हिवताप, डेंगी, लेप्टो यांसारख्या आजारांच्या असतील. पालिकेच्या उपनगरी रुग्णालयांत या चाचण्यांची सोय नसल्याने रुग्णांना खासगी प्रयोगशाळांत त्या कराव्या लागत होत्या. 
 
येथे होणार चाचण्या 

-16 उपनगरी रुग्णालये 
- पाच विशेष रुग्णालये 
- 28 प्रसूतिगृहे 
- 150 दवाखाने